सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 25 जुलै : राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत असल्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक जणं आपल्या मित्र मंडळींसोबत पार्ट्यांचं नियोजन करत आहे. परंतु, दारूच्या बाटलीसाठी (beer bottle) लोक कुठल्या थराला पोहोचतील, याचे जिवंत उदाहरण आज वैजापूरमध्ये (vaijapur) समोर आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर जवळील करंजगावाजवळ बिअरचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक (beer bottle truck accident ) उलटला. ही घटना रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. ट्रकला अपघात झाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकची पाहणी केली असता आतापमध्ये बिअरचे बॉक्स आहे, अशी माहिती मिळली. मग, काय बघता बघता बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. गावातील तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी अपघातग्रस्त बिअरच्या ट्रकवर हल्ला चढवला.
बिअरच्या बाटल्या म्हणा, बॉक्स म्हणा जे हाती लागेल, ते घेऊन गावकरी पसार झाले. एवढंच नाहीतर, गावातील काही ठग्या पोरांनी मोर्चा सांभाळला आणि ट्रकमध्ये चढून रितसरपणे बॉक्स वाटप सुरू केले. मग, काय गावकऱ्यांनी बिअरच्या बॉक्सवरच डल्ला मारला. विशेष म्हणजे, आज रविवारचा दिवस, त्यामुळे या अपघातामुळे गावकऱ्यांचं चांगलंच फुकटात निभावलं. गावकऱ्यांसह रस्त्यावरून ये जा करणाऱ्या चालकांनीही हात साफ करून घेतला. जवळपास शेकडो नागरिकांची बिअर घेण्यासाठी चढाओढ पाहण्यास मिळाली. गमंत म्हणजे, रात्रीच्या अंधारात बाटल्या फुटून अनेकजण जखमी झाले. पण, याचीही तमा न बाळगता गावकऱ्यांनी बिअरचा ट्रक खाली केला. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कुठे ही लूट थांबली. या घटनेचा व्हिडीओ मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.