औरंगाबाद, 23 ऑक्टोबर : परतीच्या पावसामुळे मराठवाड्यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते. दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी पाहणी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नसल्याची टीका वारंवार भाजप आणि शिंदेंच्या आमदार-खासदारांकडून केली जाते, यावरही उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. ‘आम्ही त्यावेळी वाढवून मदत केली होती, त्यावेळी नीती आयोगासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक झाली होती. मी माझ्या घरी आणि पंतप्रधान मोदी त्यांच्या घरी बसून होते. आम्ही घरी बसूनच काम केलं होतं. जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे. मी आणि पंतप्रधानांनी घरात बसूनच तेव्हा काम केलं होकतं. एनडीआरएफच्या निकशापेक्षा जास्त मदत दिली होती. हे निकष बदलले पाहिजेत,’ असा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला. ‘आजची माझी भेट प्रतिकात्मक आहे, मी विरोधी पक्षात आहे म्हणून आलो नाही. एका बाजूला दिवाळी दुसरीकडे शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे. विचित्र अवस्थेमध्ये भेट होत आहे. कोरोना काळात शेतकरी राबला नसता तर आपलं दिवाळं निघालं असतं,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘पुण्यात पाऊस झाला, पण उपमुख्यमंत्री म्हणाले पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही. आता इकडेही शेतात किती पाऊस पडावा हे ठरवता येत नाही, पण अस्मानी संकट आल्यावर शेतकऱ्यांना उघड्यावर सोडायचं नसतं,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला. ‘हे उत्सवी सरकार आहे. हे निर्दयी सरकार आहे. उत्सव साजरे करताना आपली राज्यातली जनता सुखी आहे का? हे पाहावं लागतं, पण यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. शेतकऱ्यांनी आसूड वापरला पाहिजे,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ‘पंचनामे करेपर्यंत शेतकऱ्यांचं आयुष्य बरबाद होतं. दिवाळी शिधा येतो तोही नीट वाटप होत नाही. हा शिधा येतो तोपण शेतकऱ्यांकडून. शेतकऱ्यांशी गद्दारी करणारं हे सरकार आहे,’ असा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला. ‘मला त्यांची कीव येतेय, स्वत: च्या स्वार्थासाठी किती आंधळेपणाने वागत आहे. त्यांना काय वागायचं ते वागू द्या. प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते. पण ज्या एका कारणासाठी सत्तांतर केलं आहे. आमच्यासोबत गद्दारी केली आहे, निदान शेतकऱ्यांसोबत तरी गद्दारी करू नये, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना टोला लगावला. ‘गेल्या काही दिवसांपासून पुण्यात प्रचंड पाऊस झाला, पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, असं उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तर असतात. आजही ते म्हणतील, संपूर्ण चिखल झाला आहे, पाणी झालं. आता ते असंही म्हणतील, ग्रामीण भागामध्ये किती पाऊस पडावा, हे सरकारच्या हातात नसतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.