औरंगाबाद, 7 नोव्हेंबर : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आज पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या प्रमुखांचे पुत्र आमने-सामने येणार आहे. विशेष म्हणजे दिवस एकच, मतदारसंघ सुद्धा एकच आणि कार्यक्रमाचा वेळ देखील एकच असणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोडमध्ये आज आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंची एकाचवेळी सभा होणार आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तर खासदार श्रीकांत शिंदेंची सायंकाळी चार वाजता सिल्लोडच्या जिल्हा परिषद ग्राउंडवर सभा होणार आहे. सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर आदित्य ठाकरे ठाकरे जाणार आहेत. यासंबंधीच्या सूचनाही सेना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी याबाबतची माहिती दिली. हेही वाचा - …आम्ही काय एकावर एक फ्री आहे का? राज ठाकरेंच्या टोलेबाजीने एकच हश्शा आदित्य ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप - राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र घटनाबाह्य सरकारने काहीच केले नाही, असा आरोप गेल्या आठवड्यात आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला होता. केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे त्यांचेच सरकार असताना राज्यातील एक इंजिन फेल गेल्यामुळे गुंतवणुकदार नाराज आहे. या एकाच व्यक्तीच्या गद्दारीमुळे महाराष्ट्र मागे पडतो आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला. तसेच नवा मोठा प्रकल्प येतोय असे उद्योगमंत्री म्हणत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारात लोकांना आमच्यापेक्षा मोठे मंत्रिमंडळ देऊ, असे आश्वासन सोबत असणाऱ्या आमदारांना देत आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता. राज्याचे मुख्यमंत्री अजूनही लोकांच्या घरी जात शाल देण्यात आणि घेण्यात व्यस्त आहे. मात्र इतर मुख्यमंत्री पाहिले तर ते राज्यासाठी काम करताना दिसून येत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला होता.