औरंगाबाद, 21 डिसेंबर : ती नेहमीच्या वेळेवर शाळेत आणि ट्युशनला जायची. त्यावेळी तो तिथे बसून तिची छेड काढत असते. त्या दिवशी देखील तो तिच्या नेहेमीच्या वेळेवर तो तिची वाट बघत होता. मात्र, ती त्याचा समोर यायच्या जागी महिला हवालदार समोर आली आणि एका अल्पवयीन रोडरोमियोची एकच धांदल उडाली ही घटना नुकतीच औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर परिसरामध्ये घडली आहे. काय घडले प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरांमध्ये महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे पालक चिंतेत आहेत. यामुळे औरंगाबाद पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सर्व पोलीस स्टेशनला शाळांमध्ये मुलींमध्ये जनजागृती करण्याचं आवाहन केलं. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी ठाण्यातील महिला हवालदार सीमा वानखेडे आणि त्यांच्या टीमला अनंत भालेराव शाळेमध्ये जनजागृती करण्यासाठी पाठवलं. यावेळी हवालदार सीमा वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलींना कायद्याबाबत ज्ञान देत कुठलीही समस्या असेल तर तुम्ही पोलिसांची संपर्क साधू शकता याबाबत विश्वास निर्माण केला.
समृद्धी महामार्गावर गाडी थांबवून गोळीबार खरा की खोटा? तरुणाच्या माहितीमुळे पोलीसही चक्रावले
… आणि तिने पोलिसांना सांगितले दरम्यान संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर पल्लवी (नाव काल्पनिक आहे) पोलीस हवालदार सीमा वानखेडे यांच्याकडे आली. यावेळी ती म्हणाली की मी सातवी मध्ये शिकत आहे. मात्र, मी शाळेत आणि ट्युशनला जात असताना रस्त्यात अनोळखी मुलगा अरुण (नाव बदलले आहे) माझी नेहमी छेड काढतो माझ्याकडे पाहून विचित्र हावभाव करतो.’ हीच गोष्ट तिने आई-वडिलानाही सांगितली. मात्र, त्या मुलाला जाब विचारला तर तो पुन्हा त्रास देईल म्हणून तिचे पालक त्याबाबत तक्रार करत नव्हते. मात्र, पोलीस स्वतःहून शाळेत आले आणि त्यांनी नाव जाहीर न करता कारवाई करण्याचा आश्वासन दिल्यामुळे पल्लवीने सीमा वानखेडे यांना तिच्या सोबतचा प्रकार सांगितला. सीमा वानखेडे यांनी संपूर्ण प्रकार वरिष्ठांना कळवून कारवाईबाबत परवानगी घेतली. यावेळी जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी तात्काळ मुलीला मदत करण्यासाठी आदेश दिले आणि एका अल्पवयीन रोडरोमियोला पोलिसांनी ताब्यात घेत त्याला आणि पालकांनाही समज दिली आहे.
महिला व मुलींनी तक्रार असेल तर पोलिसांची संपर्क साधावा महिला आणि मुलींच्या छेडछाडी आणि तक्रारीच्या प्रकरणा संदर्भात औरंगाबाद पोलीस तत्पर आहेत. मुली आणि महिलांना कुठलाही त्रास असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. महिलांनी किंवा मुलींनी तक्रार केल्यास त्यांची गोपनीयता पाळून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी पोलीस तत्पर आहेत. त्यामुळे महिला व मुलींनी तक्रार असेल तर पोलिसांची संपर्क साधावा, असं आवाहन व्यंकटेश केंद्रे यांनी केले.