Marathwada Mukti Sangram CM Eknath Shinde
औरंगाबाद, 15 सप्टेंबर : औरंगाबाद मध्ये एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आपसात छोट्या छोट्या कारणांवरून भिडत असतात. येत्या 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमावरून शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले आहे. कार्यक्रमाची वेळ आणि स्थळ यावरून राजकीय नाट्य रंगेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठवाड्यासाठी अभिमानाचा विषय आहे, त्यामुळे दरवर्षी दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री या दिवशी औरंगाबादेत येऊन शहीद स्तंभाला अभिवादन करतात. दरवर्षी हा कार्यक्रम सिद्धार्थ उद्यान येथे सकाळी नऊ वाजता होतो, यंदा हा कार्यक्रम विभागीय कार्यालयात सकाळी सात वाजता होईल, असे पत्र राज्याचे अव्वल सचिव यांनी काढले आहे, त्यामुळे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे मराठवाड्याचा अपमान झाल्याची भावना व्यक्त केली आहे. औरंगाबाद जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन कार्यक्रमाची तयारी सिद्धार्थ उद्यानात करते आहे, जिथे स्मृती स्तंभ आहे. अव्वल सचिवांनी तर विभागीय कार्यालयात कार्यक्रम करा, असे पत्रही पाठवले आहे. मग येत्या 17 तारखेला कार्यक्रम नेमका होणार कुठे याबद्दल संभ्रम आहे. देशासाहित मराठवाडा मुक्ती संग्राम दिनालाही 75 वर्षे होत आहेत, पण या कार्यक्रमाचं नियोजनही वादात सापडलं आहे.