औरंगाबाद, 15 डिसेंबर : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी देवतांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे काही व्हि़डीओ व्हायरल झाले आहेत. यावरून वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, सुषमा अंधारेंविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी विश्व वारकरी संघटनेकडून सुषमा अंधारे या ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान करू नये, अशी शपथ घेण्यात आली होती. त्यानंतर बुलडाण्यात माहाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाकडून सुषमा अंधारे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वारकऱ्यानंतर आता महानुभाव पंथ देखील सुषमा अंधारेंच्या विरोधात आक्रमक झाला आहे. श्रीकृष्णाबाबत वादग्रस्त वक्तव्य सुषमा अंधारे यांच्या भगवान श्रीकृष्णाविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महानुभाव संप्रदायाने नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ महानुभाव पंथाच्या वतीने घेण्यात आली आहे. औरंगाबादमधील महानुभाव आश्रमात भगवान श्रीकृष्णासमोर ही शपथ घेण्यात आली. आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात हा संकल्प पोहोचवणार असल्याचं महानुभाव पंथाच्या वतीने यावेळी सांगण्यात आलं.
बुलडाण्यात तक्रार दाखल
सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी देवतांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. यावरून वारकरी सप्रदाय आक्रमक झाला आहे. बुलडाण्यात माहाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाकडून सुषमा अंधारे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच सुषमा अंधारे या ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ वारकऱ्यांनी घेतली आहे. आता अंधारे यांच्याविरोधात महानुभाव पंथ देखील आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.