बीड, 21 ऑक्टोबर : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बीड जिल्ह्यात अवघ्या सात मिनिटात अतिवृष्टी ग्रस्त आणि परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दुपारी दोन वाजता येणारे कृषिमंत्री बीड जिल्ह्यात चक्क सहा वाजता पोहोचले आणि त्यांनी अंधारातच नुकसानीची पाहणी उरकून घेतली यावेळी शेतकऱ्यांनी मंत्री महोदयासमोर गाराणे मांडले. सांगा मंत्री महोदय आम्ही जगायचं कसं मुलांचे शिक्षण करायचं कसं अशी आर्त हाक दिली. परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीने ग्रस्त झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात अतिवृष्टी ग्रस्ताची पाहणी केली. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर आलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळी जाहीर करण्याची स्थिती अद्याप नाही, असं यापूर्वी स्पष्ट केलं आहे. पाणीपुरवठा मंत्र्याच्या मतदारसंघात 25 दिवसांपासून पाणीच नाही, पाटील म्हणताय, काय आकाशातून पाणी टाकू? यावेळी ते म्हणाले की, ओला दुष्काळ नसला तरी शेतीचं जे नुकसान झालंय त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे कऱण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. दिवाळीत काही कर्मचारी, अधिकारी सुटीवर असतील, पण पुढील पंधरा दिवसात पंचनाम्याचा अहवाल देतील. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असंही ते यावेळी म्हणाले.