मुंबई : सरकार जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू करत असते. मात्र या योजनांमध्ये भ्रष्टाचार शिरल्यानंतर त्या योजनेचा बट्ट्याबोळ कसा वाजतो यांचं एक उदाहरण पुन्हा एकदा पहायला मिळालं आहे. महाराष्ट्र शासनाने 75 वर्षांवरील जेष्ठांना एसटीमधून मोफत प्रवासाची योजना सुरू केली आहे. या योजनेचा अनेक वृद्धांना फायदा होत आहे. परंतु अनेक जण असे देखील आहेत. प्रत्यक्षात वयाचे 75 वर्ष पूर्ण केले नसतानाही राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाचा लाभ घेत आहेत. वयाचा पुरावा म्हणून ज्येष्ठ नागरिकांकडे आधार कार्डची मागणी केली जाते. याचाच फायदा घेऊन अनेकांनी चक्क आपल्या आधारकार्डवरील जन्म तारिखच बदलून आपले वय वाढवले आहे. असाच एक प्रकार औरंगाबादमधून समोर आला आहे. बनावट आधार कार्ड महाराष्ट्र शासनाने 75 वर्षांवरील जेष्ठांना एसटी महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याची घोषणा होताच ज्येष्ठांचे अनेक किस्से समोर येत आहेत. कोणी 105 व्या वर्षी धावत पळत जाऊन एसटी पकडत आहे. तर कोणी 377 व्या वर्षीही मोफत प्रवासाचा लाभ घेत आहे. मोफत प्रवासासाठी बनावट आधार कार्ड बनवण्याचे प्रमाण वाढल्याने एसटीचे वाहक मात्र त्रासून गेले आहेत. आधार कार्डवर अनेकांचे शंभर वर्ष पूर्ण शासनाने 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली. त्यानंतर अनेक जण बनावट आधार कार्ड वापरून याचा लाभ घेत आहे. बनावट आधार कार्ड काढताना वय किती लिहावे याचेही भान अनेकांना राहत नसल्याने आतापर्यंत अनेकांनी वयाचे शंभरी पूर्ण झाल्याचे कार्ड बनवले आहे. 377 वर्षांचा जेष्ठ नागरिक तर एकाने चक्क 1 जानेवारी 1645 मध्ये जन्म झाल्याचे आधार कार्ड बनवले आहे या कार्डनुसार या ज्येष्ठांचे वय आज घडीला 377 वर्ष इतके आहे. एवढ्या वर्षाचा वृद्ध एसटीने प्रवास करत असल्याचे ऐकून अनेकांची मती मात्र गुंग झाली आहे, तर एका जेष्ठाकडे एकाच आधार कार्ड वर 1963 व 1948 असे वर्ष नोंदवलेले आहे.