नांदेड, 1 ऑगस्ट : महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य होऊन एक महिना होत नाही तोच आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या प्रश्नांवर अखेर अशोक चव्हाण यांनी स्वत: मौन सोडलं असलं तरी त्यांच्या उत्तरामुळे संभ्रम आणखी वाढला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पत्रकारांनी अशोक चव्हाणांना भाजपमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला असता, आपण असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, एवढीच प्रतिक्रिया दिली आणि भविष्यातल्या रणनितीबाबतचा संभ्रम कायम ठेवला. भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनीही हाच मुद्दा उपस्थित करत अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना हवा दिली आहे. ‘बहुमत चाचणीवेळी अशोक चव्हाणांनी भाजपला अप्रत्यक्ष मदत केली, तेव्हा मी त्यांचे आभार मानले. जो कोणी माझ्या पक्षाला मदत करेल, त्याचे आभार मानणं माझं कर्तव्य आहे. माध्यमांनी विचारलं असता चव्हाण आपण यावर विचार केला नाही असं म्हणाले. ते काँग्रेस सोडणार नाही, असं म्हणाले नाहीत. एकनाथ शिंदेंकडे असलेले अनेक आमदार आणि खासदारही आम्ही विचार केलेला नाही, असं म्हणत होते, पण त्यांचाही दोन-चार दिवसांमध्ये विचार झाला.’ असं वक्तव्य प्रतापराव चिखलीकर यांनी केलं आहे.
अशोक चव्हाणांसह काँग्रेस आमदारांना नोटीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे 11 आमदार विधिमंडळात उशीरा पोहोचले, त्यामुळे त्यांना मतदानामध्ये सहभागी होता आलं नाही. काँग्रेसच्या या आमदारांमध्ये अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर, झिशान सिद्दीकी, राजू आवळे, मोहन हंबर्डे, कुणाल पाटील, माधवराव जवळगावकर आणि शिरिष चौधरी यांचा समावेश होता. विश्वासदर्शक ठरावावेळी मतदानाला उपस्थित न राहिल्यामुळे काँग्रेसने या आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीवरून अशोक चव्हाण नाराज असल्याचं बोललं जात आहे.