अकोला, 18 एप्रिल : एसटी कर्मचाऱ्यांची (ST Workers) कोर्टात भूमिका मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांना सातारा कोर्टाने आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना साताऱ्यात सलग चार दिवस पोलीस कोठडीत राहावं लागलं. त्याआधी सदावर्ते यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झालेल्या हल्ल्या प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांना चिथावल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी मुंबईतील किला कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या सगळ्या घडामोडी घडत असताना राज्यातील इतर वेगवेगळ्या शहरांमध्येही सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मुंबई आणि साताऱ्यातील जेलची हवा खालल्यानंतर सदावर्ते यांना आता अकोला पोलिसांकडून अटक केली जाणार आहे. विशेष म्हणजे अकोल्याचे प्रकरण हे एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचं आहे. त्यामुळे हे प्रकरण सदावर्तेंच्या अडचणी वाढवू शकतं. अकोला जिल्ह्यातील अकोट पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणातील आरोपी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अकोट न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाली असून अकोट न्यायालयाने सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी अकोट पोलिसांना परवानगी दिली आहे. या संदर्भात उद्या मंगळवारी अधिकृत आदेश निघणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडणींध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अकोल्याचं नेमकं प्रकरण काय? अकोल्यात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील व अन्य 2 जणांविरुद्ध अकोट शहर पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोला शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ( सिल्व्हर ओकवर हल्ला हा माझा आईवर होता, सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा ) या प्रकरणावर अकोट पोलीस ठाण्याचे अकोट शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. “राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. या संपामध्ये सहभागी झाल्यानंतर एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांवर बडतर्फ आणि निलंबन, अशा अनेक कारवाया केल्या होत्या. या कारवायांपासून वाचण्यासाठी औरंगाबाद डेपोचे अजयकुमार गुजर, अकोट आगारातील प्रफुल्ल गावंडे यांच्यामार्फत गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनी 74 हजार 400 रुपये अकोट शहरातील कर्मचाऱ्यांचे स्वीकारले होते. तसेच राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून 3 कोटी रुपये भूलथापा देऊन, कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ देणार नाही, असे खोटे आश्वासन देवून या चौघांनी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यांच्याविरोधात आज अकोट शहर पोलीस ठाण्यामध्ये कलम 420 आणि 434 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कुणालाही अटक झालेली नाही”, अशी माहिती पोलीस निरोक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली होती. संबंधित गुन्ह्याप्रकरणी आता सदावर्ते यांना अकोला पोलिसांकडून अटक केली जाणार आहे. सदावर्तेंच्या पत्नीची तुर्तास अटक टळली दरम्यान, सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना सहआरोपी करण्यात आले होते. सिल्व्हर ओक आणि बारामतीवर हल्ला करण्याआधी बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये जयश्री पाटील सहभागी होत्या असा आरोप मुंबई पोलिसांनी केला होता. त्यामुळे जयश्री पाटील यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी त्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. जयश्री पाटील यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सिल्व्हर ओकवर हल्ला करण्यासाठी झालेल्या बैठकीत जयश्री पाटील सामील होत्या, असा दावा मुंबई पोलिसांनी कोर्टात केला होता. तसंच, सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात जयश्री पाटील यांना सहआरोपी केले होते. पण, आता जयश्री पाटील यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.