मुंबई, 7 नोव्हेंबर : ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या एका नाटकाच्या बारा हजार पाचशे प्रयोगानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हजेरी लावली. ष्णमुखानंद सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली. काय म्हणाले राज ठाकरे - यावेळी राज ठाकरे म्हणाले की, निवडणुकीनंतर लोक जे म्हणतात ते आज आम्ही म्हणणार आहोत, आमच्या हाती काय आली तर घंटा. पण घंटा- घंट्यातील फरक आहे, ही वाजवायची घंटा आहे. ती नाटकातील आहे. राज म्हणाले, अभिनेते प्रशांत दामले यांचे बारा हजार पाचशे प्रयोग म्हणजे विक्रमच. मी हे आकडे लिहून आणले कारण माझे गणित कच्चे आहेत. प्रशांत दामले त्यांच्या आयुष्यातील कारकिर्दीत जवळपास एक हजार पाचशे बासष्ट दिवस रंगभूमीवर काम करीत आहे, ही सोपी गोष्ट नाही. ते पुढे म्हणाले की, मी अशोक सराफ यांचे परवा व्हॅक्युम क्लिनर हे नाटक पाहायला गेलो. त्यांची एंट्री होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. हा मान ते एवढे वर्ष जपत आले आहेत. प्रशांत दामलेही एवढ्या वर्षांपासून रसिकांचा मान आणि प्रेम सांभाळत आले आहेत, असे ते म्हणाले. हेही वाचा - कारस्थाने करणाऱ्यांना…, शिवसेनेनं केली देवेंद्र फडणवीसांची कंस मामांशी तुलना! प्रशांत दामलेंच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली. यानंतर आता राज ठाकरे आले. त्यांचे आणि आमचे आधी कार्यक्रम एकत्र झाले. मला असे वाटले की, या कार्यक्रमाला येऊ की नको, कारण लोकांना वाटायचे की, एकावर एक फ्री मिळतेय का? आम्ही दीपोत्सवाला एकत्र होतो. आता लोकांना वाटणार की, हे आले म्हणजे ते येणार, अशी कोपरखळीही राज ठाकरेंनी मारली. राज ठाकरे म्हणाले, या देशात मोठ्या माणसांचे सत्कार करण्यासाठी मोठी माणसे उरली नाही. आमच्यासारखे लोकांवर सत्कार आटपावे लागत आहे. विविध कलेंतील मंडळी आहे ही देशात जन्मली नसती तर या देशात कधीच अराजकता आली असती.