आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चॅलेंज
मुंबई, 5 फेब्रुवारी : आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं. ‘मी असंविधानिक मुख्यमंत्र्यांना माझ्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढण्याचं चॅलेंज देतो. मी माझ्या जागेचा राजीनामा देतो, त्यांनीही त्यांच्या जागेवरून राजीनामा द्यावा आणि माझ्याविरुद्ध वरळीमधून निवडणूक लढवावी,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. ‘ते इतकेच लोकप्रिय आणि मजबूत आहेत, तर त्यांनी माझ्या या आव्हानाचा स्वीकार करावा,’ असंही आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानाला शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं, यानंतर आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांनी एका मागोमाग तीन ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एका आमदाराने चॅलेंज दिल्यावर काहीजण असे हडबडलेत की, अख्खा गद्दार गट, त्यांच्या मित्रपक्षातले नेते आणि ‘आयटी सेल्स’ लगेच मला शिव्या देऊ लागले आहेत’, असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं.
‘हास्यास्पद आहे की ज्यांची नोंद ३३ देशांनी घेतली ते स्वतः उत्तर देऊ शकत नाहीत, ना वेदांता वर, ना बल्क ड्रग पार्क वर, ना दाव्होसच्या ₹४०कोटींच्या खर्चावर! दुर्देव आहे की हाच राग आणि आवाज महाराष्ट्रद्वेष्ट्या राज्यपालांविरुद्ध कधी दिसला नाही. महाराष्ट्राचा अपमान होताना, महाराष्ट्राची लूट होताना लपलेले असतात,’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.