निलेश पवार, प्रतिनिधी नंदुरबार, 17 जून: जिल्ह्यातील नवापूर शहराला (Navapur) लागून असलेल्या सुरत-अमरावती महामार्गावर (Surat Amravati Highway) एका कारमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला मृतदेह (dead body in plastic bag) आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नवापूर शहराजवळ टेलिफोन एक्सचेंज जवळ एका कारमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास टेलिफोन एक्सचेंजवळ एक कार बराच वेळ उभी असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. तसेच कारमध्ये कुणीही नव्हतं. त्यामुळे नागरिकांना याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांची टीमही तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि गाडीची तपासणी केली. यावेळी गाडीच्या मागील सीटवर प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेह आढळून आला. नराधम बाप स्वत:च्या मुलीवर करायचा शारीरिक अत्याचार, आईनं उचललं कडक पाऊल ही गाडी गुजरात पासिंगची असून मृतक इसमाचे अंदाजे वय 45 ते 50 वर्षे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृतकाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे व्रणही आढळून आले आहेत. हा मृतदेह कोणाचा आहे आणि या व्यक्तीची हत्या कोणी केली? तसेच ही कार इथपर्यंत कोणी आणली या सर्व प्रश्नांचा शोध आता पोलीस घेत आहेत. कारमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही बातमी परिसरात पसरताच बघ्यांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून अधिक तपास सुरू आहे. नवापूर परिसरात ही गाडी आणि मृतदेह आढळून आल्याने नवापूरचा आणि या घटनेचा काही संबंध आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत.