उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण कुठेतरी फिरण्याचे बेत आखू लागतात. अर्थात, लोक सुट्टीचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम स्थळी जाण्यास प्राधान्य देतात. परंतु, उन्हाळ्यात देशातील काही सुंदर ठिकाणांना भेट दिल्याने तुमची सहल खराब होऊ शकते. होय, खूप सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ असूनही उन्हाळ्यात काही ठिकाणांना भेट देण्याचं टाळलेलं चांगलं. जाणून घ्या, उन्हाळ्याच्या हंगामात देशातील कोणती प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत, जिथे जाण्याचा अनुभव तुमच्यासाठी आनंददायी ठरणार नाही.
गोव्याच्या उष्णतेपासून दूर राहा : समुद्र पाहण्याची आवड असलेल्या लोकांसाठी गोवा ही त्यांची पहिली पसंती असते. परंतु, या उन्हाळ्यात गोव्यात उष्णतेने कहर केलेला असतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला उष्णता अजिबात सहन होत नसेल तर, गोव्याच्या सहलीला जाऊ नका.
आग्रामध्ये वाढतो तापमानाचा पारा : देशातील सर्वात सुंदर असलेला ताजमहाल पाहणं हे अनेकांचं स्वप्न असतं. परंतु, आग्र्याचं तापमानही उन्हाळ्यात खूप जास्त असतं. अशा परिस्थितीत ताज पाहण्यासाठी थोडी वाट पाहणं योग्य ठरेल. उन्हाळ्याच्या सुटीत इथे जाण्याचा प्लॅन करू नका.
जैसलमेरला उन्हाळ्यात जाऊ नका : जैसलमेरला देशाची ‘गोल्डन सिटी’ म्हटलं जातं. दरवर्षी इथे मोठ्या संख्येने पर्यटक जमतात. मात्र, थारच्या वाळवंटापासून जवळ असल्यामुळे, जैसलमेरचा पारा उन्हाळ्यात 42-45 अंशांच्या पुढे जातो. त्यामुळे उन्हाळ्यात जैसलमेरला जाणं तुमच्यासाठी चुकीचा पर्याय असू शकतो.
चेन्नईला उन्हाळ्याच्या कडाक्यात जाणं टाळा : तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई शहराचं सौंदर्य कोणापासून लपून राहिलेलं नाही, पण उष्मा वाढल्याने चेन्नईच्या तापमानातही मोठी वाढ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात चेन्नईला सहलीला जाण्यामुळे सुट्टीचा आनंद खराब होऊ शकतो.
उन्हाळ्यात अमृतसरला जाऊ नका : पंजाबचं सुंदर शहर अमृतसरही उन्हाळ्याच्या तडाख्यातून सुटू शकत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सुवर्ण मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल, तर उन्हाळ्याच्या काळात ही सहल रद्द करणं हिताचं असेल.
खुजराहोला उन्हाळ्यात भेट देण्याचा प्लॅन बनवू नका : मध्य प्रदेशातील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेले खुजराहोचे मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र मानलं जातं. मात्र, वाढत्या उष्णतेमध्ये खुजराहोचे दगडही तापू लागले आहेत. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात खुजराहोची सहल टाळण्याचा प्रयत्न करा. (अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. न्यूज 18 याची हमी देत नाही.)