6 फुटांच्या चिंचोळ्या घरात जेमतेम आडवं होऊन पाय पसरायला जागा असते, तिथे कुटुंब संसार थाटतात. म्हणायला श्रीमंत देशातल्या कॉफिन होम्समधलं हे जनावरांच्या कोंडवाड्यासारखं जगणं पाहून अंगावर शहारे येतील.
एखाद्या प्रेताप्रमाणे हे लोक या छोट्याश्या घरात पडून राहतात, म्हणून या खोल्यांना कॉफिन होम असं नाव दिलं आहे.
हाँगकाँग - जगातील सर्वात महागड्या देशांपैकी एक. तिथल्या मोठमोठ्या इमारती, लक्झरी जीवनशैली, महागड्या रेस्टॉरंट्स यासाठी हा देश ओळखला जातो. तिथेच ही काड्यापेटीसारखी घरं आहेत.
'कॉफिन होम' तयार करण्यासाठी फ्लॅट्स 15 ते 120 चौरस फुटांच्या अपार्टमेंटमध्ये विभागले जातात. अर्थात बेकायदेशीरपणे. यामुळे एका अपार्टमेंटमध्ये अशा अनेक खोल्या होतात.
एवढ्या लहान खोल्यांमध्ये राहण्यासाठीसुद्धा लोकांना सुमारे 250 अमेरिकन डॉलर्स एवढं भाडं द्यावं लागतं.
कॉफिन होम्समध्ये राहणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. 2 लाखाहून अधिक लोक अशा कॅफिन होम्समध्ये राहतात. सुमारे 75 लाख लोकसंख्या असलेल्या या देशात 2 लाख लोक अशा परिस्थितीत जगत आहेत, ज्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.
कॉफिन होम्स केवळ 6 फूट लांबीचे असतात. तेवढ्याच जागेत लोक झोपतात, स्वयंपाक करतात, जेवतात आणि फॅन, टीव्ही, फ्रिजसारख्या जीवनावश्यक वस्तूही ठेवतात.
कॉफिन होम्समध्ये राहणारे सामान्यत: वेटर, सिक्युरिटी गार्डस, डिलिव्हरी मॅन आणि सफाई कर्मचारी अशी कामं करणारे लोक असतात.
1950 च्या दशकात हजारो चिनी स्थलांतरित लोक हाँगकाँगमध्ये आले होते. त्यांना कमी खर्चात राहण्यासाठी जागा नव्हती, म्हणून ही अशी कॉफिन होम्स तयार करण्यात आली.
हाँगकाँगची कॉफिन होम्स म्हणजे मानवतेचा अपमान असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाने (UN)म्हटलं आहे आणि हे आरोग्य संकट असल्याचं जाहीर केलं आहे.