एरंड किंवा कडुनिंबाच्या (Neem Tree) झाडांच्या छोट्या फांद्या किंवा फांद्यांचे छोटे तुकडे भारतात जुन्या काळी दातवण (Chew Sticks) म्हणून वापरले जात असत. दातवण म्हणजे दात घासायची काडी. त्याला संस्कृतमध्ये दंतकाष्ठ असं म्हटलं जातं. ब्रश आल्यानंतर दातवण वापरण्याची पद्धत हद्दपारच झाली; मात्र भारतीय संस्कृती (Indian Culture) किंवा इतिहासातल्या गोष्टी भारतात कालबाह्य झाल्यानंतर पाश्चात्य जग मात्र त्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन त्या नव्याने वापरायला सुरुवात करते, असे अनुभव वारंवार येतात. असाच एक अनुभव आता आला आहे तो कडुनिंबाच्या दातवणाच्या बाबतीत. या दातवणांचं बंडल अमेरिकेत तब्बल 1800 रुपयांना ऑनलाइन विकलं जात आहे. कडुनिंबाचे वैद्यकीय गुणधर्म सांगून, त्याचं ब्रँडिंग (Branding) करून कंपन्या या दातवणांच्या विक्रीतून मोठा नफा कमावत आहेत. कडुनिंबाची वैद्यकीय उपयुक्तता सर्वांनाच माहिती आहे. आयुर्वेदिक औषधांत (Ayurvedic Medicines) त्यांचा वापर केला जातो. त्वचारोग, पोटाचे रोग आदींसह अनेक विकारांवरच्या औषधोपचारांमध्ये कडुनिंबाचा उपयोग होतो. तसंच, पूर्वीच्या काळी दात निरोगी आणि मजबूत होण्यासाठी एरंड किंवा कडुनिंबाच्या दातवणाने दात घासले जात. पाश्चात्य जगातल्या प्रगतीचे वारे भारतात वाहू लागल्यावर अनेक गोष्टी बदलल्या. दात घासायला ब्रश हातात कधी आला हेच कळलं नाही. आता काही भारतीय इलेक्ट्रिक ब्रशच्या वापरापर्यंत पोहोचले आहेत आणि अमेरिकेत मात्र कडुनिंबाचं दातवण लोकप्रिय होत आहे. नीम ट्री फार्म्स (Neem Tree Farms) नावाच्या वेबसाइटवर कडुनिंबाचे दातवण 1800 रुपयांना उपबलब्ध आहेत. कडुनिंबाचे गुणधर्म सांगून त्याचं ब्रँडिंग केलं जात आहे. या कंपनीने स्वतःच कडुनिंबाच्या झाडांची लागवड केली असून, त्याच्या फांद्या तोडून दातवणांची विक्री केली जात आहे. ती वेबसाइट चेक केल्यानंतर लक्षात आलं, की अमेरिकेत दातवणांना खूपच मागणी आहे. आपल्या गरजेनुसार आवश्यक त्या आकाराच्या दातवणांची ऑर्डर ग्राहक नोंदवतात. सहा इंच लांबीच्या दातवणांना सर्वांत जास्त मागणी असल्याचं समजतं. दातवणांचं पॅकेट उघडलं, की त्यातली दातवणं तीन महिने वापरण्यायोग्य असतात. ती कशी साठवायची, याची माहितीही कंपनीने सोबत दिलेली असते. दातवणं कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवता येतात; मात्र ती फ्रीझरमध्ये ठेवायची नाहीत, असं कंपनीने म्हटलं आहे. अॅमेझॉनवरही (Amazon) कडुनिंबाची दातवणं उपलब्ध आहेत. अमेरिकेत त्याची किंमत सुमारे 800 रुपये आहे. या किमतीत 100 दातवणांची दोन पॅकेट्स डिलिव्हर केली जातात. अॅमेझॉनमधून भारतात ऑर्डर केली, तर त्यांची किंमत 1200 रुपये आहे. हा विरोधाभास आहे, की ज्या गोष्टींना आता भारतात अक्षरशः कोणीही विचारत नाही, त्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन परदेशात मात्र त्या गोष्टींची मागणी वाढत चालली आहे. अनेक व्यवसाय त्यातून नफा कमावत आहेत.