लसणाचा वास अधिक असतो कारण त्यात सल्फर मोठ्या प्रमाणात असते. याचा प्रभाव शरीरात दीर्घकाळ टिकतो. लसणामध्ये अँटीबायोटिक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. लसूण हा उष्ण आहे, त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा मर्यादित वापर करावा.
लसूण भारतीय खाद्यपदार्थांमध्ये असतोच. पण चायनीज आणि थाई पदार्थांची चवही त्याशिवाय पूर्ण होत नाही. लसणाला भाजी म्हणायचे की मसाला, या मुद्द्यावरही चर्चा रंगतात. लसूण हा असा खाद्यपदार्थ आहे की, तो खाल्ल्यास त्याचा घामाला वास येऊ लागतो. पूर्वीच्या काही अंधश्रद्धांमुळे याचा उपयोग दुष्ट आत्म्यांना दूर करण्यासाठी केला जात असे. भारतातील लसणाचे मूळ धर्माशी संबंधित आहे. त्याचे गुणधर्म इतके प्रभावी आहेत की, ते क्वचितच इतर कोणत्याही भाज्या किंवा मसाल्यात असतील.
क्षेत्रफळ आणि उत्पादनानुसार जगात लसणाच्या उत्पादनात चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. लसणाच्या उत्पत्तीबद्दल दोन प्रवाह आहेत. एक म्हणजे पौराणिक आख्यायिकांनुसार, लसूण आणि कांद्याची उत्पत्ती समुद्रमंथनाशी संबंधित आहे. मंथनातून निघालेलं अमृत देवांना वाटलं जात असताना एका राक्षसानेही ते गुपचूप प्यायलं. हे कळताच भगवान विष्णूंनी आपल्या चक्राने त्याचं मस्तक शरीरापासून वेगळं केलं. लसूण आणि कांद्याची उत्पत्ती त्या राक्षसाच्या रक्त आणि अमृतापासून झाली, असं सांगितलं जातं. या उत्पत्तीमुळे या दोघांचाही तामसिक आहाराच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. 700-800 ईसापूर्व लिहिलेल्या भारतातील प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ 'चरकसंहिता' मध्ये लसणाचं वर्णन केलं आहे. याचे वर्णन कृमी आणि कुष्ठरोगाचा नाश करणारे, वातनाशक आणि प्रभावाने उष्ण असं केलं आहे.
दुसऱ्या विचारसरणीनुसार, लसूण हे मध्य आशिया आणि ईशान्य इराणचे पीक आहे. त्यामुळे ते 5000 वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये आल्याचेही सांगितले जाते. इतिहासात असा उल्लेख आहे की प्राचीन इजिप्तमध्ये लोक एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या थडग्यात लसूण ठेवत असत. लसूण आता भाजीचा अविभाज्य भाग बनला आहे. भारतात, असं मानलं जातं की, लसून इतर भाज्यांची उग्रता काढून टाकतो. शिवाय, तो चायनीज आणि थाई पाककृतींमध्ये वापरला जातो कारण, तो भाज्या किंवा मांसाहाराच्या नकारात्मक घटकांचा प्रभाव कमी करतो. तसंच चरबी प्रतिबंधित करतो.
लसूण खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी तर येतेच. शिवाय, त्याचा वास माणसाच्या रक्ताद्वारे त्याच्या घामापर्यंत पोहोचतो. हा वास त्या माणसाला जाणवतोच आणि जो त्याच्या संपर्कात येईल, त्यालाही जाणवतो. जगातील कोणत्याही फळ किंवा भाजीमध्ये अशी खासियत नाही. याशिवाय, रोमानियाचे लोक त्यांच्या घरापासून दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी लसूण वापरतात. ते त्यांच्या घराच्या दारावर आणि खिडक्यांवर लसणाच्या माळा लटकवतात, जेणेकरून वाईट आत्मे त्यांच्या घरात प्रवेश करू नयेत.
लसूण ही भाजी की मसाला यावर वाद सुरू आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (पुसा) डॉ. नावेद साबीर यांच्या म्हणण्यानुसार, तांत्रिकदृष्ट्या लसूण ही भाजी असली तरी ती मसाला म्हणूनही वापरली जाते. याचं कारण एकट्या लसणाची भाजी करता येत नाही. यामुळे अधिक प्रक्रिया करून मसाला म्हणून वापरला जातो. ते म्हणाले की, लसणाचा वास जास्त असतो कारण त्यात सल्फर मोठ्या प्रमाणात असतं. याचा प्रभाव शरीरात दीर्घकाळ टिकतो. सरकारी अधिकारी आणि आयुर्वेदाचार्य डॉ. आरपी सिंह यांच्या मते, लसणात अँटीबायोटिक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे आयुर्वेदात याला खूप महत्त्व आहे. लसूण नैसर्गिक पद्धतीने रक्त पातळ ठेवतो. कोलेस्ट्रॉलमध्ये तो फायदेशीर आहे. ते म्हणाले की, लसणाचा प्रभाव उष्ण असतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा मर्यादित वापर करावा. याचं जास्त प्रमाणात सेवन केल्यानं अॅसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
देशातील इतर भाषांमध्ये लसणाची नावे - कन्नडमध्ये बेळ्ळोळी, तेलुगुमध्ये तेलगड्डा, तमिळमध्ये वल्लईपुंडू, मल्याळममध्ये वेल्लुल्ली, गुजरातीमध्ये लसाना, मराठीमध्ये लसूण, बंगालीमध्ये रसून आणि इंग्रजीमध्ये Garlic.