मुंबई, 15 मे : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा (Corona) कहर पाहायला मिळत आहे. एकिकडे उपचारांनंतर अनेक रुग्ण कोरोनामुक्त होत असताना दुसरीकडे दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. त्यातच अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाले तरी काहींना नंतरही अनेक आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. कोरोनामुक्त रुग्णांनी बरे झाल्यावर आरोग्यविषयक कोणत्याही समस्येकडं दुर्लक्ष करू नये, अन्यथा गंभीर आजार उद्भवू शकतात, असा सल्ला तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी देत आहेत. देशात सध्या रिकव्हरी रेट वाढल्यानं नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे. मात्र कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही अनेकांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येत आहे. नव्या संशोधनानुसार, कोरोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक दीर्घकालीन गुंतागुंत पाहायला मिळत आहे. रुग्ण बरा झाल्यावरही या समस्या बराच काळ पाहायला मिळू शकतात. ही समस्या लाँग कोविड किंवा कोविड पश्चात कोविड सिंड्रोमच्या स्वरुपात पाहिली जातात. यात जरी रुग्णाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी सुमारे 4 आठवडे त्या रुग्णात लक्षणं दिसून येतात. आकडेवारीनुसार 4 पैकी 1 रुग्णामध्ये दीर्घकाळ लक्षणं दिसून येतात, असं आज तक च्या वृत्तात म्हटलं आहे. हे वाचा - देशाची चिंता वाढवणाऱ्या Mucormycosis आजारातून कसं बरं होणार?; जाणून घ्या उपाय त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांना केवळ फॉलोअप किंवा स्क्रिनिंगचीच नाहीतर प्रत्येक धोक्याचा इशारा आणि लक्षणे ओळखण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कोरोनासारखी लक्षणं कायम राहतात एका अहवालानुसार, कोरोनामुक्त रुग्णांना 1 आठवड्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर लक्षणं दिसू लागतात. यात सातत्याने खोकला, अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायू दुखणं, ब्रेनफॉग यांचा समावेश असतो. कोरोना व्यतिरिक्त काही रुग्णांमध्ये शरीराच्या खराब कार्यामुळे या दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात. यामुळे पचन संस्था (Digestion), न्यूरोलॉजिकल (Neurological) आणि इन्फ्लेमेटरी (Inflammatory) यंत्रणेवर वाईट परिणाम होतो. मानसिक आजार कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांमध्ये मानसिक आजारांची लक्षणंही दिसत आहेत. त्यात मूड डिसॉर्डर, एकाग्रता कमी होणं, स्मृतीभ्रंश, तणाव किंवा चिंता, क्रोनिक इन्सोमेनिया किंवा आधाराशिवाय कोणतंही काम करण्यात अडचणी येणं अशी लक्षणं दिसल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नये. किडनी विकार कोरोनामुक्त रुग्णांमध्ये किडनी विकार दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. कोरोनामुक्त झाल्यावरही पायांवर सूज दिसत असेल तर ही बाब घातक ठरू शकते, असं डॉक्टर सांगतात. जास्त लघवी होणं किंवा त्याचा रंग बदलणं याबाबी देखील असामान्य आहेत. अचानक वजन वाढणं, खराब पचनशक्ती किंवा भूक न लागणं ही लक्षणं किडनी विकाराशी निगडीत आहेत. त्यात ब्लड शुगर (Blood Sugar) किंवा ब्लड प्रेशर (Blood Pressure) वाढणं ही बाबदेखील चांगली नाही. डायबिटीज डायबिटीज किंवा मधुमेह (Diabetes) असणाऱ्या रुग्णांसाठी कोरोना अधिक खतरनाक ठरू शकतो. हा विषाणू स्वादुपिंडासारख्या महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचू शकतो. यामुळे इन्सुलिन नियंत्रणावर परिणाम होतो. त्यामुळे कोरोनाशी सामना करत असलेल्या रुग्णांनी आपली ब्लड शुगर लेव्हल सातत्याने तपासली पाहिजे. तसंच काही वेगळी लक्षणं दिसत असतील तर त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. प्रमाणापेक्षा जास्त भूक किंवा तहान लागणं, अंधुक दिसणं, जखम भरून न येणं, अति थकवा, पायांमध्ये जडपणा वाटणं या लक्षणांकडे लक्ष ठेवा. यापैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. मायोकार्डाटिस किंवा हदयाशी संलग्न अडचणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान असं दिसून आलं आहे की कोरोनामुक्त रुग्णांना ब्लड क्लॉट किंवा रक्ताची गुठळी आणि हार्ट अटॅकसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. कोरोनामुळे अल्पवयीन रुग्णांमध्ये या समस्या दिसून येत आहेत. यामुळे श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत दुखणं, खूप थकवा येणं अशा समस्या दिसून येतात. कोरोनामुळे हार्टबीट, मायोकार्डाटिस किंवा हृदयाशी निगडीत समस्या उद्भवू शकतात, असं डॉक्टर सांगतात. हे वाचा - Corona काळात गुळण्या करण्याचे फायदे आणि तोटे; ऐका डॉक्टरांचा सल्ला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर हार्ट इन्फ्लेमेशन (Heart Infflamation) 5 व्या दिवसानंतर उद्भवू शकते. त्यामुळे वेळेवर तपासणी आणि उपचार आवश्यक आहेत. काही लक्षणं ही हदयावर दुष्परिणाम झाल्याची चिन्हे दर्शवतात. छातीत अस्वस्थता जाणवणं, हातात जडपणा किंवा दुखणं, सतत घाम येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, ब्लड प्रेशर आणि हार्टबीट अनियंत्रित असणं ही लक्षणं दिसतात.