गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या चांद्रयानासह चीनने तांदुळाचं बियाणं अवकाशात पाठविलं होतं. चीनच्या अंतराळ यानातून आता 1500 दाणे पृथ्वीवर आले आहेत. हे आता चीनच्या विद्यापीठात पेरले जाणार आहेत.
नवीन विक्रम करण्यासाठी चीन जगभरात प्रसिद्ध आहे. अंतराळात तांदूळ उत्पादन केल्याचा चीनचा दावा सध्या गाजतो आहे. अंतराळातून आलेल्या तांदुळाच्या दाण्यांना चीनने Space Rice असं नाव दिलं आहे. चीनने अंतराळात उगवलेलं आपलं पहिलं प्रायोगिक धान्य बियाण्याच्या स्वरूपात पृथ्वीवर आणलं आहे.
रिपब्लिकवर्ल्ड डॉट कॉमच्या वृत्तानुसार, चीनने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या चांद्रयानसह भात बियाणं अवकाशात पाठविलं होते. आता अंतराळ यानातून 1500 तांदुळाचे दाणे पृथ्वीवर आले आहेत. त्यांचं वजन 40 ग्रॅम आहे. हे दक्षिण चीन कृषी विद्यापीठ परिसरामध्ये पेरले जाईल.
स्पेस राइसच्या बियाण्याची लांबी सुमारे 1 सेंटीमीटर एवढी आहे. काही काळ अंतराळाच्या निर्वात वातावरणात राहिल्यानंतर बियाण्यामध्ये बरेच बदल होतात. त्यांना जमिनीत पेरल्यास जास्त उत्पन्न मिळतं, असा चीनचा दावा आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार चीनने आतापर्यंत कापूस ते टोमॅटोपर्यंत असे 200 हून अधिक पिकांवर प्रयोग केले आहेत. चीन 1987 पासून तांदूळ आणि इतर पिकांचे बियाणे अवकाशात पाठवत आहे.