नवी दिल्ली, 24 जून : आधीच जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरसच्या उद्रेकासाठी चीनला जबाबदार धरलं जातं आहे. त्यात आता गलवान खोऱ्यात चीनी सैन्याने जो क्रूर खेळ केला त्यामुळे चीनबद्दल देशात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आणि याच दरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होऊ लागली. ज्यामध्ये Boycott China असं लिहिलेले टी-शर्ट (T-shirt) आणि टोपीचे (cap) फोटो व्हायरल होऊ लागले. हे प्रोडक्ट मेड इन चायना असून चीनच चीनविरोधी प्रोडक्ट विकत असल्याचं सांगितलं जातं आहे. भारत आणि जगभरात चीनबाबत असलेला असंतोष पाहता आपल्या प्रोडक्टची मागणी वाढवण्यासाठी चिनी कंपन्या #BoycottChina लिहिलेले प्रोडक्ट उत्पादित करून त्यांची विक्री करत आहेत, अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या. तुम्हालाही अशी पोस्ट आली असेल. मात्र ही बातमी कितपत खरी आहे. खरंच चीन असे प्रोडक्ट विकत आहे का? यामागे काय तथ्य आहे? हे वाचा - राहुल गांधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, चीनसोबतच्या ‘त्या’ करारावर केला सवाल याची सुरुवात झाली ती द फॉक्सी या वेबसाईटने एक जूनला दिलेल्या बातमीनंतर. या वेबसाईटने चीनमध्ये #BoycottChina टी-शर्ट आणि बॅनर्सची उत्पादन केलं जातं असल्याचं सांगितलं. यावेळी भारत आणि चीनमधील तणाव वाढलेला होता. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि त्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.
चिनी मीडिया ग्लोबल टाइम्स ने याचा पाठपुरावा केला. ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, चिनी वस्त्रोद्यागो कंपन्यांनी हे दावे खोटे ठरवलेत. चिनी कंपन्यांना चीनमध्ये असे चीनविरोधी उत्पादनं करता येत नाही. कायद्यानुसार त्यावर बंदी आहे. ही बातमी फेक असल्याचं चिनी सरकारच्या अधिकाऱ्यानेही ग्लोबल टाइम्सला सांगितलं. संकलन, संपादन - प्रिया लाड