नवी दिल्ली 25 मे : आजकाल उन्हाचा कडाका वाढला की प्रत्येकाला एअर कंडिशनर (Air Conditioner) अर्थात एसीच्या (AC) थंडगार हवेचे सुख हवेहवेसे वाटू लागते. सगळीकडे एसी, कूलर पाहिजेत असं वाटू लागतं. अर्थात आजकाल बहुतांश कार्यालयात एसी असतात. अनेक लोक घरीही एसी लावतात. दिवसरात्र एसीच्या थंड हवेत बसून काम करताना छान वाटतं; पण हे सुख आरोग्याच्या दृष्टीनं मात्र त्रासदायक ठरू शकतं हे लक्षात घ्या. सतत एसीत राहणं हानिकारक असून, त्यामुळं अनेक रोगांना निमंत्रण मिळतं. याबाबतीत तज्ज्ञ सातत्यानं धोक्याची सूचना देत असतात; पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर एसीचा वापर जितका कमी केला जाईल, तितकं चांगलं आहे, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लठ्ठपणा : एसीमुळे लठ्ठपणा (Obesity) वाढतो. थंड ठिकाणी आपल्या शरीराची ऊर्जा खर्च होत नाही, त्यामुळे शरीरावरील चरबी वाढते. एसीमध्ये सतत राहिल्यानं थकवा जाणवतो. थकलेलं शरीर व्यायाम करू शकत नाही. त्यामुळं कॅलरी खर्च होत नाहीत. परिणामी शरीरावर चरबीचे थर वाढत जातात आणि लठ्ठपणा वाढत जातो. डोकेदुखी : एसीचे तापमान खूपच कमी असेल तर डोकेदुखी (Headache) आणि चिडचिडेपणा जाणवू शकतो. कारण आपल्या मेंदूच्या शिरा तापमानातील बदल पेलू शकत नाहीत. सर्दी : एसीमधून सामान्य तापमानात किंवा गरम ठिकाणी गेलात तर ताप येऊ शकतो. एक - दोन दिवस नव्हे तर अनेक दिवस हा ताप राहाण्याची शक्यता असते. इतकेच नव्हे तर जेव्हा एसीचे तापमान खूप कमी होते तेव्हा डोकेदुखी आणि चिडचिडेपणा जाणवू शकतो. सर्दी (Cold), ताप (Fever) यापासून सुरुवात होऊन ताप मेंदूत जाऊ शकतो. उन्हाळ्यात मेंदूचा ताप येण्याचे मुख्य कारण म्हणजे एसीच्या थंडगार हवेतून बाहेर पडून सामान्य तापमानात किंवा अती उष्ण तापमानात जाणे हेच असते. कोरडी त्वचा : एसीच्या हवेचे दुष्परिणाम आपल्या त्वचेवरही (Skin) दिसून येतात. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा नष्ट होतो आणि आपली त्वचा कोरडी (Dry) होते. विशेषत: चेहऱ्याची त्वचा ताणली जाते. त्यामुळं तुम्ही दीर्घकाळ एसीत राहात असाल तर, मॉइश्चरायझरचा वापर करणं आवश्यक आहे. हाडे : सतत एसीच्या कमी तापमानात बसल्यानं गुडघेच नाही तर शरीरातील सगळे सांधे (Joints) दुखू लागतात. त्यामुळं सांध्यांची कार्यक्षमताही कमी होते. याकरता खुर्चीवर बसल्या बसल्या छोटे, छोटे व्यायाम करणं आवश्यक आहे. तर या त्रासापासून वाचता येईल. श्वसनावर परिणाम : तापमान आणि आर्द्रतेत अचानक झालेल्या बदलांमुळे आपल्या श्वसन व्यवस्थेवर (Respiratory System) परिणाम होतो. त्वचा कोरडी पडते. एसीच्या हवेतून होणाऱ्या संसर्गामुळे दम्यासारखे आजार वाढू शकतात. धुळीची अॅलर्जी होऊ शकते. एसीच्या हवेमुळे राइनाइटिस आणि फेरींगिटिस हे घशाचा दाह आणि जखमांशी संबंधित आजारही होऊ शकतात. डोळ्यांचा त्रास : एसीमुळे कॉन्टॅक्ट लेन्सेस (Contact Lenses) वापरणाऱ्या लोकांना त्रास होऊ शकतो. लेन्स वापरत असताना डोळ्यात ओलसरपणा असणं आवश्यक असते; पण एअर कंडिशनरमुळे डोळे कोरडे होतात. त्यामुळं लेन्सवर परिणाम होतो आणि त्या लवकर खराब होतात. त्यातून संसर्ग होण्याचा धोकाही असतो. प्रतिकार शक्ती : उष्णता सहन करण्यासाठी आपलं शरीर घाम (Sweat) निर्माण करते. श्वासोच्छवासाद्वारे किंवा घामाच्या माध्यमातून माणसाचे शरीर उष्णतेपासून सुटका मिळवते, परंतु एसी या दोन्ही क्षमता कमी करतो. त्यामुळं जेव्हा आपण एसीच्या बाहेर जातो तेव्हा आपल्याला जास्त गरम वाटू लागते आणि आजारी पडण्याचा धोका वाढतो.