JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / कॅन्सर, डायबेटिज रुग्णांना मोठा दिलासा; ही औषधं स्वस्त, इथं पाहा यादी

कॅन्सर, डायबेटिज रुग्णांना मोठा दिलासा; ही औषधं स्वस्त, इथं पाहा यादी

केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधांची 2022 साठीची यादी जाहीर केली आहे. यात 384 अत्यावश्यक औषधांचा समावेश केला आहे.

जाहिरात

केंद्र सरकारकडून अत्यावश्यक औषधांची यादी जारी.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 सप्टेंबर : आपण आजारी पडलो तर सर्वप्रथम डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घेतो. अलीकडच्या काळात हृदयविकार (Heart Disease), डायबेटीस (Diabetes) आणि कॅन्सरसारख्या (Cancer) गंभीर आजारांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे साहजिकच उपचारांवरचा खर्चही वाढला आहे. आजार कोणताही असला तरी त्यावर औषधं (Medicine) घ्यावीच लागतात. कॅन्सरसारख्या आजारांवरचे उपचार जास्त खर्चिक असतात. हा खर्च सर्वसामान्य नागरिकांना पेलवतोच असं नाही. औषधांचे दर वाढवताना किंवा निश्चित करताना कंपन्या मनमानी करतात. परिणामी औषधं अधिक महाग होतात. बऱ्याचदा अशी औषधं सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाहीत. ही स्थिती लक्षात घेऊन सरकारने अत्यावश्यक औषधांची 2022 साठीची राष्ट्रीय यादी (National List) जाहीर केली आहे. यात 384 अत्यावश्यक औषधांचा (Essential Medicine) समावेश केला आहे. यामुळे ही औषधं नागरिकांना तुलनेनं रास्त दरात उपलब्ध होणार आहेत. एकीकडे महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना दुसरीकडे आजार बरा होण्यासाठी महागड्या औषधांवर भरमसाठ खर्च करावा लागतो. महागडी औषधं खरेदी करण्यासाठी अनेक नागरिकांची आर्थिक कुवतदेखील नसते; पण रुग्णाच्या आरोग्यासाठी आर्थिक ओढाताण सहन करून अनेक जण महागडी औषधं खरेदी करतात. ही स्थिती लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) अत्यावश्यक औषधांची यादी अर्थात एनएलईएम (NLEM) घोषित केली आहे. यात 27 श्रेणींमध्ये 384 औषधांचा समावेश करण्यात आला आहे. सात वर्षांनंतर घोषित करण्यात आलेल्या या यादीत 34 नव्या औषधांचा समावेश झाला असून, 26 औषधं यादीतून हटवण्यात आली आहेत. हे वाचा -  Fever Precautions : अचानक ताप आल्यास कोणतं औषध घ्यावं? डॉक्टरांनी दिला असा सल्ला अत्यावश्यक औषधांच्या यादीत संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या 18 औषधांचा समावेश करण्यात आला आहे. जिवाणू, तसंच बुरशीच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या औषधांचे दर आता कमी होणार आहेत. आयव्हरमेक्टिन (Ivermectin) या औषधाचाही या यादीत समावेश केला गेला आहे. हे परजीवी मारण्याचं औषध असून, कोरोनाकाळात ते अनेक रुग्णांना देण्यात आलं होतं. संसर्ग टाळण्यासाठी इट्राकोनॅझोल, मुपिरोसिन, टर्बिनाफिन, डॅकलेटेस्टिवर, मेरोपनेम, सेफ्युरोक्साईम, एमिकासिन, बेडाक्विलाइन, डेलामेनिड, एबीसी डोलटेग्रेवीर यांसारखी औषधं या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

यासोबतच कॅन्सरवरची औषधं, अँटीबायोटिक्स, लशी, सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी वापरली जाणारी निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी (Nicotine replacement therapy) यांसह मधुमेहावरील अनेक महत्त्वाची औषधं या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. यामुळे रुग्णांना पूर्वीपेक्षा स्वस्त दरात औषधं मिळू शकणार आहेत. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल औषधं म्हणजे अँटासिड सॉल्ट रॅनिटिडाइन (Ranitidine) आणि सुक्राल्फेट यांना या यादीतून वगळण्यात आलं आहे. हे वाचा -  कोरोनाला रोखण्यासाठी नाकावाटे देण्यात येणारी लस अधिक प्रभावी? `या यादीच्या आधारे औषधांची कमाल किंमत ठरवली जाईल. कोणतीही कंपनी स्वतःच्या मर्जीनं किमती वाढवू शकणार नाही. आरोग्य मंत्रालयाने कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या चार प्रमुख औषधांचा यादीत समावेश केला आहे. बॅंडामुस्टीन हायड्रोक्लोराइड, ईनोटेकन एचसीआय ट्रायहायड्रेट, लोनालिडोमाइड आणि ल्युप्रोलिड अ‍ॅसिटेट या औषधांच्या किमती आता कमी होऊ शकतील,` अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली. संपूर्ण अत्यावश्यक औषधांची यादी पाहण्यासाठी इथं क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या