मुंबई, 17 जून : नुकत्याच आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारी भागात बरंच नुकसान झालं. काही ठिकाणी झाडं पडली, तर काही ठिकाणी घरांची छतं उडून गेली. अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटामुळे छतावरच्या सोलर पॅनलचं नुकसान झालं असेल, तर कंपनीकडून त्याची नुकसानभरपाई मिळू शकते का? याबाबत गुजरात राज्य ग्राहक आयोगानं दिलेला एक निर्णय महत्त्वपूर्ण ठरू शकतो. चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे भरपूर हानी होते. नुकत्याच आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातच्या किनारी भागाला मोठा फटका बसला. राज्यात मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून पिकं उद्ध्वस्त झाली. काही ठिकाणी विजेचे खांब पडले, झाडं उन्मळून पडली. काही घरांचे पत्रे आणि छतही उडून गेली. आता अनेक जण छतावर सोलर पॅनल बसवतात. अशा वादळांमध्ये त्याचंही नुकसान होतं. मात्र त्याची भरपाई मिळू शकते का? हा सर्वसामान्यांसमोर मुख्य प्रश्न असतो. याबाबत गुजरात राज्य ग्राहक आयोगाचा एक निकाल दिशा देणारा ठरू शकतो. 3वर्षांपूर्वीच्या अशाच एका प्रकरणामध्ये आयोगानं हा निकाल दिला आहे. यात जिल्हा ग्राहक मंचानं दिलेला नुकसानभरपाईबाबतचा निर्णय आयोगानं बदलला आहे. गुजरातमधील भावनगरमध्ये जयेंद्रसिंह जडेजा या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं 2019 मध्ये घराच्या छतावर 3.10 KWचं सोलर पॅनल लावलं होतं. सरकारी अनुदान घेऊन त्यांनी सॅनेलाईट सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 85 हजार रुपये दिले. त्यावर त्यांना 5 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी मिळाली. 1 जून 2020 ला आलेल्या एका वादळामध्ये त्यांच्या छतावरची 3 सोलर पॅनल खाली पडली व इन्स्टॉलेशनचंही नुकसान झालं. कंपनीकडून दुरुस्तीसाठी कर्मचारी पाठवण्यात आले, तेव्हा आणखी 3 पॅनलचं नुकसान झालं. मात्र, कंपनीनं वॉरंटी अंतर्गत त्यांची दुरुस्ती करण्यास नकार दिला. कंपनीच्या या धोरणाविरोधात जडेजा यांनी जिल्हा ग्राहक मंचात धाव घेतली. कंपनीनं खराब उत्पादन दिलं व इन्स्टॉलेशनही नीट केलं नाही असा आरोप त्यांनी केला. कंपनीनं त्याची दुरुस्ती करावी किंवा भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली. मंचानं जडेजा यांच्या बाजूनं निर्णय देत, नुकसानभरपाई म्हणून 1 लाख रुपये देण्याचे आदेश कंपनीला दिले. तसंच त्यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी 50 हजार रुपये व कायदेशीर खर्चासाठी 5 हजार रुपये देण्यास सांगितलं. या निर्णयाला कंपनीनं राज्य ग्राहक आयोगात आव्हान दिलं. त्यावेळी गुजरात राज्य ग्राहक आयोगानं जिल्हा ग्राहक मंचाचा निर्णय बदलला. सोलर पॅनल नीट चालत नसल्याचं या घटनेत आढळून येत नाही. तसंच जडेजा यांना दिलेलं उत्पादन निकृष्ट दर्जाचं असल्याचा कोणताही पुरावा जडेजा यांनी दिला नाही. उत्पादनाच्या वॉरंटीमध्ये नैसर्गिक संकटांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळू शकत नाही. तसंच एक्स्टेंडेड वॉरंटीमध्ये उत्पादनाच्या निर्मितीत काही दोष असेल व इन्स्टॉलेशनमध्ये अडचणी असतील, तरच भरपाई मिळू शकते. नैसर्गिक आपत्तीमध्ये उत्पादनाचं नुकसान होणार नाही, याची खात्री कोणताही विक्रेता देऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारे भरपाईची मागणी करता येणार नाही, असा निर्णय राज्य ग्राहक आयोगानं दिला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये बिपरजॉय वादळामुळे कुणाच्या घराच्या छतावरील सोलर पॅनल खराब झाल्यास नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता कमी दिसते.