नवी दिल्ली 02 जून: वेगवेगळ्या आजारांशी असलेला चीनचा संबंध काही सुटण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जगभर थैमान घातलेल्या कोविड-19च्या प्रसाराची सुरुवातही चीनमधूनच झाली होती. आता चीनमध्ये H10N3 या बर्ड फ्लूच्या (Bird Flu) नव्या स्ट्रेनची (New Strain) माणसामध्ये पहिल्यांदाच लागण झाल्याचं आढळलं आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) घोषणा करून लोकांना यापासून दक्ष राहण्याचं आवाहन केलं आहे. चीनच्या शिनजियांग शहरात महिन्याभरापूर्वी 41 वर्षांची एक व्यक्ती आजारी पडल्याने हॉस्पिटलमध्ये गेली. त्या व्यक्तीला प्रचंड ताप आणि सर्दी झाली होती. ही लक्षणं कोरोनाशी साधर्म्य असलेली होती; मात्र त्याला H10N3 या बर्ड फ्लू स्ट्रेनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. या विषाणूचा संसर्ग कसा झाला, याबद्दलची माहिती मिळू शकली नाही; मात्र याबद्दलचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलं आहे. बर्ड फ्लूचा H10N3 हा स्ट्रेन आजपर्यंत पाहण्यात आली नव्हती; मात्र तो धोकादायक असल्याचं समजतं आहे. जगभरातली या प्रकारची पहिलीच केस आहे. कोरोनाच्या प्रसाराच्या संशयाची सुई आधीच चीनकडे वळलेली असल्यामुळे बर्ड फ्लूची ही केस सापडल्यानंतर चीनने लगेचच स्वतःला वाचवण्याची धडपड सुरू केली आहे. हा स्ट्रेन लो पॅथोजेनिक (Low Pathogenic) असून, त्यापासून आजार पसरण्याचा धोका कमी असतो, असं तिथल्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितलं आहे. अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) या संस्थेने सांगितलं, की लो पॅथोजेनिक स्ट्रेन केवळ पक्ष्यांपुरताच असतो. माणसांमध्ये हा स्ट्रेन किती संसर्गजन्य किंवा घातक ठरेल, याचा पत्ता अद्याप लागलेला नाही, असंही त्या संस्थेने म्हटलं आहे. बर्ड फ्लूच्या या नव्या स्ट्रेनमुळे देश-विदेशातल्या संस्था सतर्क झाल्या आहेत. तसंच, कोरोनाप्रमाणे हा स्ट्रेन घातक ठरू नये, यासाठी तो स्ट्रेन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा विषाणू कसा पसरतो? बर्ड फ्लूचे अनेक स्ट्रेन्स वातावरणात असतात. परंतु त्यापैकी काही स्ट्रेन्सचाच माणसांमध्ये संसर्ग होऊ शकतो. बर्ड फ्लूला वैज्ञानिक भाषेत एव्हियन एन्फ्लुएंझाही म्हणतात. हा विकार टाइप ए (Type A) विषाणूद्वारे पसरणारा आहे. साधारणतः हे विषाणू जंगलांत पसरतात; मात्र पोल्ट्री (Poultry) आणि पक्ष्यांवरही त्यांचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळेच यापैकी काही स्ट्रेन्स माणसांपर्यंत पोहोचू शकल्या. H5N1 हे एव्हियन एन्फ्लुएंझाचं सर्वसामान्य रूप असून, ते खूप संसर्गजन्य आहे. त्याच्यावर वेळीच इलाज झाला नाही, तर ते प्राणघातक ठरू शकतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एव्हियन एन्फ्लुएंझाचे (Avian Influenzas) पहिले रुग्ण 1997मध्ये सापडले होते. संसर्ग झालेल्या जवळपास 60 टक्के नागरिकांचे प्राण गेले. त्यात सर्दी, श्वास घेण्यात अडथळा, कंजंक्टिव्हायटिस, घशात सूज, वारंवार उलटी होणं अशी लक्षणं दिसत होती. जिथे पक्ष्यांची/कोंबड्यांची संख्या जास्त असते, तिथे हा विषाणू पसरण्याची शक्यता जास्त असते. पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्यांच्या श्वासाच्या मार्गे विषाणू शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे पोल्ट्रीत काम करणाऱ्यांवर याचा सर्वांत पहिल्यांदा परिणाम दिसतो. त्यानंतर कोंबड्या खरेदी करणाऱ्या व्यक्ती, तसंच अर्धवट शिजलेलं मांस खाणाऱ्या व्यक्तींना या विषाणूची लागण होण्याची शक्यता जास्त असते. बर्ड फ्लूच्या अनेक स्ट्रेन्स आहेत. त्यांची अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही. माणसांत संसर्ग होणाऱ्या काही स्ट्रेन्सबद्दलची माहिती मिळाली आहे. त्यात H7N3, H7N7, H7H9, H9N2 आणि H5N1 या पाच स्ट्रेन्सचा समावेश आहे. त्यापैकी H5N1 ही आतापर्यंतची सर्वांत धोकादायक स्ट्रेन मानली जाते. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी हा विषाणू सतत स्ट्रेन बदलत राहतो. शास्त्रज्ञांना अगोदर बर्ड फ्लूबद्दल फारशी चिंता वाटत नव्हती; मात्र कोरोनाची जगद्व्यापी साथ पसरल्यानंतर अनेक गोष्टींचा वेगळ्या पद्धतीने विचार केला जात आहे. आवश्यक ती काळजी घेतली गेली नाही, तर बर्ड फ्लूदेखील जागतिक साथीचं रूप घेऊ शकतो, अशी शक्यता नाकारली जात नाही. म्हणूनच चीनमध्ये बर्ड फ्लूची पहिली स्ट्रेन सापडल्यानंतर CDC नेही यावर भाष्य केलं. तसंच, माणसं पोल्ट्री, कोंबड्या यांच्या सान्निध्यात असणं, हेदेखील या चिंतेचं कारण मानलं जात आहे.