अशोक सराफ-सिद्धार्थ जाधव
मुंबई, 23 मार्च- मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमांमधूनसुद्धा आपली छाप पाडली आहे. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. आणि आजसुद्धा अनेक पुरस्कार देऊन त्यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाबाबत त्यांचं कौतुक होत असतं. दरम्यान अशाच एका पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांना सन्मानित करताना फक्त मामाच नव्हे तर उपस्थित सर्वच कलाकार भावुक झालेले दिसून आले. नुकतंच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये नॅशनल क्रश म्हटली जाणारी साऊथ सुंदरी रश्मिका मंदाना सहभागी झाली होती. रश्मिकाने अमृता खानविलकरच्या चंद्रा या लोकप्रिय गाण्यावर लावणी सादर करत सर्वांनाच घायाळ केलं होतं. रश्मिकाचे अनेक सुंदर व्हिडीओ आणि फोटो समोर आले होते. त्यांनतर आता या पुरस्कार सोहळ्यातील आणखी एक अप्रतिम क्षण समोर आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पानावतील. (हे वाचा: Vandana Gupte: मराठमोळ्या वंदना गुप्तेंनी 70 व्या वर्षी पुन्हा बांधली लग्नगाठ; समोर आले फोटो **)** झी मराठीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ झी गौरव पुरस्कार सोहळ्यामधीलच आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधवच्या एका कृतीमुळे सर्वच भारावून गेलेले दिसून येत आहेत. अभिनेत्याच्या त्या परफॉर्मन्सने सर्वच भावुक होत, कलाकारांच्या डोळ्यातून अश्रू येताना दिसत आहेत.
अशोक सराफ यांना इंडस्ट्रीत मामा म्हणून ओळखलं जातं. लहान-वयोवृद्ध सर्वच कलाकार त्यांना मामा म्हणूनच बोलावतात. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधव मामांच्या गाण्यांवर आणि त्यांच्याच गेटअपमध्ये एक सुंदर परफॉर्मन्स सादर करतो. आणि परफॉर्मन्स होताच तो पळत अशोक सराफांजवळ जाऊन त्यांच्या पायात नतमस्तक होतो. या क्षणाने मामा भारावून जातात. आणि त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू यायला लागतात. दरम्यान यावेळी मामाच नव्हे तर सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, अलका कुबलसह सर्वच कलाकारांचे डोळे पाणवतात सर्वच त्या क्षणात भारावून गेलेलं दिसले.
त्यांनतर सिद्धार्थ जाधव अशोक सराफ यांना सन्मानित करण्यासाठी मंचावर चलण्याची विनंती करतो. आणि यावेळी महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर अशोक सराफांना घेऊन व्यासपीठावर येतात. हा क्षण अतिशय भावनिक होता हे या व्हिडिओतून दिसून येत आहे.