'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी मोडतोड कदापि सहन केली जाऊ शकत नाही'
मुंबई, 07 नोव्हेंबर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने चित्रपट बनवणाऱ्यांनी इतिहासाची मोडतोड करू नये, हे अजिबात सहन केले जाणार नाही, अशा शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी दिग्दर्शकांना इशारा दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभा असलेला पक्ष आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी मोडतोड कदापि सहन केली जाऊ शकत नाही, अशी कडक भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.
तसंच, चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित पुरावे उपलब्ध असलेली तथ्ये जशीच्या तशी दाखवावीत,कुठेही इतिहासाशी छेडछाड करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित तथ्यांची मोडतोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही, असंही पाटील यांनी ठणकावून सांगितलं. (राज ठाकरेंनी आवाज दिलेल्या चित्रपटावरुन संभाजीराजे संतापले, इतिहासाची मोडतोड कराल तर…) दरम्यान, रविवारी संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवरायांवर सिनेमा तयार करणाऱ्यांना इशारा दिला होता. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत.
सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचा विपर्यास चालणार नाही. मराठा लाईट इन्फन्ट्रीचं घोषवाक्य हर हर महादेव आहे. त्याचा अपमान नको. तसेच वेडात मराठे वीर दौडले सातचा फोटो बघा. गाठ संभाजी छत्रपतींशी आहे, हे लक्षात ठेवा’ असा इशाराच संभाजीराजेंनी दिला होता. (हेही वाचा - Video : शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारच का? पाहा Inside Story ) एकाही मावळाच्या डोक्यावर पगडी नाही हा मोठा अपमान आहे. त्यामुळे सगळ्या प्रोड्युसरला इशारा आहे. हर हर महादेववर कायदेशीर दावा करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. तसेच माझे सहकार्य असल्याचे सिनेमांत लिहीले आहे. मात्र, चुक आपली आहे. आपण वाचत नाही. खरा इतिहास वाचायला हवा. कोण आडवं आलं तर पुढचं पुढे बघा, असा इशाराही त्यांनी दिला होता.