'सिंहासन'चा दिगू टिपणीस आणि महाराष्ट्राच्या सत्ता नाट्याचा काय आहे संबंध?
मुंबई, 2 जुलै- महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंड केलं आहे. त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत थेट शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सगळ्या प्रकारानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्वीट करत यावर प्रतिक्रिय दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे, “आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. …हा दिगू टिपणीस कोण याबद्दलचं आपण जाणून घेणार आहे. याचा महाराष्ट्राच्या सत्तानाट्याशी नेमका काय संबध आहे. कोण होता दिगू टिपणीस ? ‘सिंहासन’ हा 70 च्या दशकातील गाजलेला मराठी चित्रपट आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 1979 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जवळ-जवळ 40 वर्ष होऊन गेली आहेत. पण आजची राजकीय परिस्थिती पाहता हा सिनेमा डोळ्यासमोर येतो आणि यातील दिगू टिपणीस हे कॅरेक्टर डोळ्यासमोर उभं राहतं. खांद्याला शबनमची बॅग, डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा, किंचित वाढलेलं दाढीचे खुंट अन मळकट सैल सदरा अशा वेशात संपूर्ण चित्रपटात आपला मुक्त वावर असणारा पत्रकार दिगू टिपणीस (निळू फुले). या सिनेमात दिगू टिपणीसची भूमिका ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी साकारली होती. जेएनयू मध्ये दाखवणार ‘72 हूरें’; निर्माते म्हणाले ‘..तरच दहशतवादाचं सत्य समजेल’ ‘सिंहासन’ हा महाराष्ट्रातल्या सत्तेच्या राजकारणाची लक्तरं चव्हाट्यावर आणणारा चित्रपट प्रदर्शित झाला आणि आज चाळीस वर्षे उलटून गेल्यावरही, आणि मुख्य म्हणजे कोणताही पक्ष सत्तेवर असो; त्या पक्षातले अंतर्गत हेवेदावे, सुंदोपसुंदी, तसंच कुरघोडीचं राजकारण यांचं विदारक दर्शन दिगू टिपणीस आपल्याला बातमीदाराच्या भूमिकेतून घडवत राहतो. राज्यात दुष्काळ पडलेला असतो, भीषण पाणीटंचाई असते; पण सत्ताधारी पक्षाचे नेते मात्र केवळ मुख्यमंत्र्याची खुर्ची आपल्यालाच कशी मिळू शकेल, या सत्ताकारणात गुंतलेले असतात. हा राजकीय खेळ बघून शेवटी दिगू टिपणीसच्या मनावर परिणाम होतो आणि तो कोलमडून पडतो. शेवटी काय होतं दिगू टिपणीसचं ? दिगू टिपणीस सगळं जवळून पाहत असतो, त्याला कळत असतं की, राज्याचे प्रश्न वेगळे आहेत. पण याचं कोणालचं काही पडलेलं नाही. सर्वांना फक्त आपली खुर्ची पाहिजे आहे, या सगळ्याचा परिणाम दिगूच्या मनावर होतो…यालाच धरून राज ठाकरे यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांना देखील हेच सांगायचे आहे.
नेमकं राज ठाकरे यांचे ट्वीट काय आहे? राज ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की,“आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?”