तुषार कपूर
मुंबई, 13 नोव्हेंबर : मुंबईत एक हॅटमॅन किलर फिरत असल्याचा दावा केला जातो आहे. ट्विटरवर #HatmanKillerInMumbai हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागलेलं पहायला मिळालं. या व्हिडीओमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. पण खरंच मुंबईत असा हॅटमन किलर फिरतो आहे का? काय आहे या व्हायरल व्हिडीओमागील सत्य? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे. याशिवाय अभिनेता तुषार कपूर आणि या हॅटमॅन किलरचा काय संबंध आहे? हाही प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. सोशल मीडियावर 1:34 मिनिटांची एक सीसीटीव्ही कॅमेरा क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओत एक महिला गाडीतून उतरते. त्यानंतर कार महिलेला तिथेू सोडून पुढे निघून जाते. त्यानंतर तिथे काळा कोट आणि काळी टोपी घातलेला एक व्यक्ती येतो आणि महिलेवर सपासप वार करतो. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी होऊन तिथेच कोसळते. त्यानंतर हल्लेखोर तिच्या पायाला धरुन ओढतच रस्त्याच्या पलिकडच्या फुटपाथवर नेतो. या व्हिडीओमुळे अनेक लोक घाबरले आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी मुंबईत असा कोणताही हॅटमॅन किलर नसल्याचं सांगितलं आहे. तर मग हा व्हिडीओ नेमका काय आहे?
व्हायरल होणारा हा व्हिडीओ म्हणजे एका फिल्म प्रमोशनची आयडिया असल्याचं समोर आलंय. तुषार कपूरची आगामी फिल्म मारिचचं हे प्रमोशन असल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती @DewangT ट्विटर अकाऊंटवर देण्यात आली आहे. आता हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याविषयी तुषार कपूरने अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
दरम्यान, तुषार कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्या ‘मारिच’ चित्रपट 9 डिसेंबरपासून चित्रपटगृहांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच तुषार कपूर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. ध्रुव लाथेर यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे वर्णन व्होडुनिट थ्रिलर म्हणून केले आहे.