अभिनेत्री विमी
मुंबई, 18 मार्च- भारतीय सिनेसृष्टीला एकसे एक सुंदर आणि दमदार अभिनेत्री लाभल्या आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री विमी होय. या अभिनेत्रीने काही मोजकेच सिनेमे केले आहेत. मात्र या छोट्याश्या सिने करिअरमधून तिने अफाट लोकप्रियता, प्रेक्षकांचं प्रेम आणि गडगंज संपत्ती कमावली होती. अगदी यशाच्या शिखरावर जाऊन अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीतून गायब झालं होती. विमीचं फिल्मी करिअर तर अगदी सुंदर होतं. मात्र तिचं खरं आयुष्य फारच भयानक होतं. आपला काळ गाजवलेल्या विमीने खऱ्या आयुष्यात अनेक दुःख आणि त्रास सहन केले आहेत. असं म्हटलं जातं की, फक्त आयुष्यच नव्हे तर अभिनेत्रीच्या आयुष्याचा शेवटही फार भयानक होता. विमीने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हा ती आधीपासूनच विवाहित होती. इतकंच नव्हे तर ती दोन मुलांची आई होती. असं असूनदेखील त्याकाळात विमी रातोरात स्टार बनली होती. आपल्या निरागस हास्याने आणि दमदार अभिनयाने विमीने सर्वांनाच भुरळ पाडली होती. (हे वाचा: रीना रॉय सोबत घटस्फोटावर पाकिस्तान क्रिकेटर मोहसीन खानने सोडलं मौन, म्हणाले पश्चाताप… ) विमी ही सुनील दत्त ते शशी कपूर, राज कुमार यांच्यासमवेत काम करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक होती. करिअरच्या सुरुवातीलाच स्टारडम पाहणाऱ्या विमीचं आयुष्य आणि शेवट अतिशय वेदनादायक होता. इतक्या कमी कालावधीतही अभिनेत्रीने प्रेक्षकांवर अशी छाप पाडली आहे की, आजही लोक तिच्या आयुष्याबाबत जाणून घ्यायला आतुर असतात. ‘हमराज’ हा विमीचा पहिला चित्रपट होता. याच चित्रपटाद्वारे ती रातोरात स्टार बनली. यानंतर ती वचन, आबरु, पतंगा या चित्रपटांमध्ये दिसली होती. विशेष म्हणजे 60 च्या दशकात विमी तब्बल 3 लाख फी घेत असे. पण, तिचं आयुष्य इतक्या वाईट परिस्थितीतून गेलं की त्याची साधी कल्पना करणंही कठीण जाईल. पतीपासून घटस्फोट घेत विभक्त झाल्यानंतर विमीला ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं होतं, त्याला दारुचं व्यसन लागलं आणि या व्यसनामुळे त्याने अभिनेत्रीला वेश्याव्यवसायाकडे ढकललं.इथूनच अभिनेत्रीच्या आयुष्याचा भयानक काळ सुरु झाला होता.
या सर्व प्रकारात विमीचं सिने करिअर अवघ्या 10 वर्षातच उद्ध्वस्त झालं. आणि तिला एकटीला आयुष्य घालवावं लागलं. विमीचा मृत्यू तिच्या आयुष्यापेक्षाही वाईट होता असं म्हटलं जातं. वयाच्या 34 व्या वर्षी विमी गंभीर आजारी पडली आणि आर्थिक अडचणींमुळे तिला हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. जेव्हा विमीचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या पार्थिवाला खांदा देणारंही कोणी नव्हतं. तिला ढकल गाडीतून स्मशानभूमीत नेण्यात आलं होतं. आलिशान बंगल्यात राहणारी आणि कायम लग्जरी गाड्यांतून फिरणाऱ्या विमीचा शेवट मात्र डोळ्यात पाणी आणणारा ठरला होता.