The kapil sharma show
मुंबई, 19 सप्टेंबर : सगळ्यांना खळखळून हसवणारा लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. या शोचा नवीन सिझन नुकताच सुरु झाला आहे. कपिल शर्माचा हा शो कायम चर्चेत राहिला. त्यातील मुख्य कारण म्हणजे आजपर्यंत यात काम करून प्रेक्षकांना हसवणाऱ्या अनेक कलाकारांनी या शोमधून एक्झिट घेतली आहे. यामध्ये सुनील ग्रोव्हर, अली असगर यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. तर आता कृष्णा अभिषेक, कपिलचा जिवलग मित्र चंदू यांचाही या यादीत समावेश झाला आहे. पण यातील एका कलाकाराने कपिल शर्मा शो का सोडला याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. त्याची आता सर्वत्र चर्चा होतेय. एकेकाळी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आजीची भूमिका फारच लोकप्रिय झाली होती. प्रसिद्ध अभिनेता अली असगर ही दादी साकारायचा. ही दादी प्रेक्षकांना पोट धरून हसवत असली तरी या अभिनेत्याच्या मुलांना त्याच्या भूमिकेमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अली असगरने शो का सोडला त्याची खरी कहाणी आता समोर आली आहे. ‘द कपिल शर्मा शो’चा भाग असलेला अली असगर ‘झलक दिखला जा 10’ या सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. दमदार डान्स परफॉर्मन्स देत त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. या शोमध्ये अलीच्या मुलांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याच्या मुलांनी त्याच्यासाठी भावुक मेसेज दिला. या व्हिडिओमध्ये त्याच्या मुलांनी सांगितले कि, ‘‘कपिल शर्मा शोतील बाबांच्या भूमिकेमुळे शाळेत आम्हाला अनेक टोमणे ऐकायला मिळायचे. ते म्हणायचे कि. तुला दोन आई आहेत. आम्हाला आजीचा मुलगा, आजीची मुलगी, बसंती वगैरे म्हणत.’’
पुढे अलीची मुलगी म्हणाली कि, ‘‘पण आम्हाला ट्रोलिंगची पर्वा नाही. इतरांना हसवण्यासाठी स्वतःची चेष्टा करून घेणं हे कोणीही करू शकत नाही जे तुम्ही केलं. आम्हाला तुमचा अभिमान आहे. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो बाबा.’’ मुलांचा हा व्हिडीओ ऐकून अली खूपच भावुक झाला. त्याला त्याचे अश्रू रोखता आले नाहीत. हेही वाचा - 40 दिवस उलटूनही Raju Srivastava यांना का नाही आली शुद्ध?, समोर आलं कारण पुढे अलीने सांगितले कि, ‘‘मला लोक तेव्हा एक स्त्री म्हणूनच ओळखायचे. दादी’ ची भूमिका करण्याआधी सुद्धा मी एक स्त्रीच्या भूमिकेत काम केले आहे. एक वेळ आली जेव्हा मी आठवड्यातून चार दिवस एक स्त्री म्हणून टीव्हीवर येत होतो. पण एक दिवस माझ्या मुलाने मला ‘तुम्हाला दुसरं काही करता येत नाही का?’ असा प्रश्न विचारला. आणि तेव्हाच मी ठरवलं कि आता इथूनपुढे मी हे काम करणार नाही.’’ अली असगरने साकारलेली दादी आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. पण प्रेक्षकांना हसवणाऱ्या या अभिनेत्याची दुःखद कहाणी मात्र आता समोर आली आहे. या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्स करत अली असगरला पाठींबा दिला आहे.