तेजश्री प्रधान आणि वैभव तत्ववादी
**मुंबई, 23 ऑक्टोबर :**मराठी चित्रपटसृष्टीत काही कलाकारांच्या जोड्या अश्या आहेत ज्यांनी एकमेकांसोबत मोजकंच काम केलं आहे पण ते प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिलं आहे. यामध्ये तेजश्री प्रधान आणि वैभव तत्ववादी यांचं नाव अग्रणी घेता येईल. तेजश्री प्रधानने मराठी मालिका आणि चित्रपटातून विविध भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तर मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता वैभव तत्ववादीने मराठीसोबतच हिंदीतही नाव कमावलं आहे. आता ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीची फेव्हरेट सून म्हणुन प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता वैभव तत्ववादी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकतीच वैभव आणि तेजश्री यांच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. ते दोघेही लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट प्रेम आणि नाती यांच्यावर आधारलेला असणार आहे. हेही वाचा - VIDEO: वाह दादा वाह! भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी समीर चौगुले थेट ऑस्ट्रेलियात तेजश्री आणि वैभव यांच्या चित्रपटाचं नाव ‘सोलमेट्स’ असून त्याचं दिग्दर्शन प्रकाश कुंटे करणार आहेत. यापूर्वी तेजश्री आणि वैभव झी युवा वाहिनीवरील ‘प्रेम हे’ या मालिकेत झळकले होते. अगदी एका भागापुरतेच हे दोघे प्रेक्षकांसमोर आले होते. पण आजही ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे. या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. आता पुन्हा एकदा ही जोडी एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. तब्बल 5 वर्षानंतर हे दोघे एकत्र प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
तेजश्री यापूर्वी मालिकांमधून झळकली आहे. तिची ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेतील शुभ्रा ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाली होती. सोबतच तिने नुकतीच तिच्या निर्मिती संस्थेची देखील स्थापना केली आहे. आता तिला एवढ्या दिवसांनी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
वैभव हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो चाहत्यांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. वैभव हा मराठी चित्रपटातील लोकप्रिय कलाकार तर आहेच, पण बॉलिवूडमध्येही तो चांगलाच पसंतीचा चेहरा आहे. अशातच कायम चर्चेत असणारा वैभव सध्या बॉलिवूडमध्येही आपलं नशीब आजमावताना दिसत आहे. ‘बाजीराव मस्तानी’ नंतर तो ‘घर वापसी’ या वेबसीरिजमध्येही दिसला होता. ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटाने वैभवला खरी लोकप्रियता मिळवून दिली. प्रार्थनासोबतची त्याची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता तो तेजश्रीसोबत दिसणार आहे. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी आणि चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक झाले आहेत.