मुंबई, 19 ऑगस्ट- अभिनेता किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत आपल्याला आलेले अनुभव आणि एखाद्या गोष्टीवरील आपलं मत व्यक्त करताना दिसतात. त्यांची प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून आपल्याला तडकाफडकी काढल्याचं सांगत किरण चर्चेत आले होते. या प्रकरणात निर्माते आणि अभिनेता दोघांनी अनेक आरोप-प्रत्यारोप केले होते. दरम्यान आता किरण माने यांची नवी पोस्ट चर्चेत आली आहे. ही पोस्ट खास त्यांनी ‘टकाटक’ बॉईजसाठी लिहलीय. किरण माने फेसबुक पोस्ट- …‘टकाटक 2’ मधी या पोरानं धम्माल उडवून दिलीय भावांनो ! प्रथमेश परब ह्या पोराचं पयल्यापास्नंच मला लै लै लै कौतुक वाटतं. मी ह्याला मुंबैतल्या इंटर काॅलेज एकांकिका स्पर्धांपास्नं बघतोय. रूढ अर्थानं ज्याला पिच्चरचा ‘हिरो’ म्हन्लं जातं तसं ह्याच्या पर्सनॅलिटीत काय बी नाय. उलट रस्त्यावरनं फिरताना एखाद्या पोराला “अय् हिरोS, बाजूला सरक.” असं म्हन्लं जातं, त्या टाईपमधी हे पोरगं येतं…आनि आजकाल तर मराठी फिल्म इंडस्ट्रीतबी उंच, गोर्यापान, देखन्या, बाॅडीबिल्डर पोरांचं ‘पीक’ आलंय. तरीबी सोत्ताच्या हिमतीवर, अभिनयाच्या ताकदीवर, आत्मविश्वासावर, सगळ्या हॅंडसम हंक पोरास्नी “अय् हिरो, बाजूला सरक.” म्हनत, हे पोरगं ‘हिरो’ झालं ! एक नाय, दोन नाय चार-चार सुप्परडुप्परहिट्ट पिच्चर दिले !! …‘टकाटक’ त्यातलाच एक. तीनचार वर्षांपूर्वी या पिच्चरनं बाॅक्स ऑफिसवर रेकाॅर्डब्रेक धमाका केलावता. मराठीत काॅलेज गोईंग पोरापोरींना ‘टारगेट ऑडीयन्स’ मानून, त्यांची आवडनिवड डोळ्यापुढं ठेवून लै कमी पिच्चर आले. हे लक्षात घेवून दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी टकाटकच्या निमित्तानं ‘सेक्स काॅमेडी’ ह्यो प्रकार लै नादखुळा पद्धतीनं हाताळला. तरून पोरापोरींची भाषा, त्यांचे शब्द, डबल मिनिंग डायलाॅग्ज, सेक्सबद्दल त्या वयातलं मनात असलेलं कुतूहल, त्यातनं होनार्या चुका आनि शेवटी माफक उपदेशाचा डोस…अशा पद्धतीचा ‘टकाटक’ काॅलेजच्या पोरापोरींनी डोक्यावर घेतला.
त्याचाच दूसरा पार्ट ‘टकाटक 2’ काल रिलीज झाला. माझीबी त्यात एक छोटी पण इंट्रेस्टिंग भुमिका हाय. अडनिड्या वयात, या पोरांच्या मनात उधळनार्या घोड्यांना लगाम घालायचं काम मी, स्वप्निल राजशेखर, पंकज विष्णू, स्मिता डोंगरे यांच्यावर आहे. काल स्पेशल स्क्रीनिंगला गेलोवतो. अक्षरश: हसून हसून पोटात दुखायला लागलं. ‘ते’ काॅलेजचे दिवस आठवले. हा पिच्चर फक्त काॅलेजला जानार्या टीनएजर्ससाठी नाय भावांनो. आपल्यालाबी ‘त्या’ रंगीन,जादूई काळात एक मस्स्त चक्कर मारून यायची आसंल, त्या काळातलं ‘काय काय’ भन्नाट आठवायचं आसंल, आनि मन,मेंदू फ्रेश करायचा आसंल तर ‘टकाटक 2’ नक्की बघा ! **(हे वाचा:** Spruha joshi : स्पृहाने घेतलयं स्वतःला बदलण्याचं चॅलेंज; चाहत्यांकडून होतंय कौतुक ) प्रथमेश, भावा या पिच्चरच्या शुटिंग, प्रमोशनच्या निमित्तानं तुला जवळनं बघितलं आनि तुझं लैच कौतुक वाटलं. माझ्या करीयरमधी अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले लै लै लै हिरो बघितलेत मी. सिरीयलच्या दुनियेत तर असे पैशाला पन्नास असत्यात. म्हनून मी अशा पोरांपास्नं जरा फटकून लांब असतो. पन तू येगळाच निघालास. ‘सुपरहिट’ असूनबी तुझ्यात कनभरबी गर्व नाय. प्रमोशनला फिरताना ‘सिनीयर’ म्हनून सतत माझी काळजी घेनं… कुठलाबी कमीपना न मानता सोत्ताची खुर्ची मला बसायला देन्यापास्नं, सतत माझ्या चहापान्याची विचारपूस करनं… कॅमेर्यापुढं तेवढ्याच एनर्जीनं, आत्मविश्वासानं वावरनं.. हे सगळंच सांगत होतं ‘तू लंबी रेस का घोडा है’ ! लिख ले. आप्पुन ने भौत दुनिया देखेली है…आप्पुन का अंदाज़ा ग़लत होईच नै सकता… लब्यू ‘.