स्वरा भास्कर
मुंबई,22 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘तनु वेड्स मनू’ आणि ‘राँझना’ या चित्रपटांमधून तिला वेगळी ओळख मिळाली. याशिवाय, ती राजकीय मुद्द्यांवर उघडपणे आपलं मत मांडण्यासाठी चर्चेत असते. गेल्या काही दिवासांपासून ती आपल्या आंतरधर्मीय लग्नामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. स्वरा भास्करनं नुकतंच समाजवादी पक्षातील युवा नेता फहाद अहमदशी कोर्ट मॅरेज केलं आहे. त्यामुळे ती अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या निशाण्यावर आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी स्वरावर जोरदार टीका करत तिची तुलना श्रद्धा वालकर या खून झालेल्या हिंदू तरुणीशी केली आहे. काही महिन्यांपूर्वी श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालानं तिचा गळा दाबून खून केला आणि तिच्या शरीराचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. या घटनेचा आधार घेत साध्वी प्राची म्हणाल्या की, बॉलिवूड अभिनेत्री स्वरावर श्रद्धासारखी परिस्थिती ओढावू शकते. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. “स्वरा भास्कर नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात असल्याचं दिसलं आहे. मला खात्री होती की, ती नक्कीच आंतरधर्मीय लग्न करेल आणि तिने तेच केलं आहे. तिनं एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं आहे,” असं साध्वी प्राची म्हणाल्या. त्या पुढे असंही म्हणाल्या, “कदाचित स्वरानं, आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे कसे केले, या बातमीकडे लक्ष दिलेलं नाही. एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी तिने एकदा फ्रीज बघायला हवा होता. ही तिची वैयक्तिक निवड आहे. मला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही. पण, जे श्रद्धासोबत झालं ते स्वरासोबतही घडू शकतं.”
(हे वाचा: Swara Bhasker Wedding: आलिया भट्टप्रमाणे स्वरा भास्करही लग्नापूर्वीच प्रेग्नन्ट? बेबी बम्पचे फोटो व्हायरल ) 16 फेब्रुवारी रोजी, स्वरा भास्करनं फहाद अहमदशी साखरपुडा केल्याची घोषणा केली. स्वरा आणि फहाद यांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्नही केलं. या कायद्यामुळे भारतीय नागरिकांना धर्मांतर न करता आंतरधर्मीय लग्न करण्याची परवानगी मिळते. मात्र, इस्लामिक धार्मिक विद्वानांनी शरिया कायद्यांतर्गत स्वरा-फहादच्या लग्नाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. स्वरानं इस्लाम स्वीकारलेला नाही यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरू झाले आहेत.
अमेरिकेतील शिकागोस्थित इस्लामिक विद्वान यासीर नदीम अल वाजिदी म्हणाले की, स्वरा भास्करचं लग्न कायदेशीर आहे कारण तिनं कोर्टात जाऊन लग्न केलं आहे. पण, इस्लामिक कायद्यानुसार ते वैध नाही. अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी सांगितलं की, इस्लामनुसार फहादशी लग्न करण्यासाठी स्वरा भास्करला अगोदर इस्लाम स्वीकारावा लागेल.