मुंबई, 19 जून : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची मुंबई पोलिसांनी बराच काळ चौकशी केली. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. रियाने पोलिसांना सुशांतशी ओळख कशी झाली इथपासूनची सगळी माहिती दिली आहे. त्याबरोबरच 6 जूनलाच आपण सुशांतचं घर सोडलं होतं, असंही या अभिनेत्रीने सांगितलं. सुशांत आणि रियाची ओळख 2013 साली झाली होती. त्या वेळी सुशांत ‘यशराज’चा चित्रपट शुद्ध देसी रोमान्स करत होता आणि रिया चक्रवर्ती टमेरे डॅडी की मारुती’ नावाच्या चित्रपटासाठी काम करत होती. त्या दोघांच्या चित्रपटांचे सेट एकमेकांसमोर होते. तिथेच दोघांची पहिली भेट झाली आणि मैत्री झाली. त्या वेळी सुशांत रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर वेगवेगळ्या पार्टी आणि इतर समारंभांना रिया आणि सुशांत भेटत होते. सुशांत फार काही वैयक्तिक गोष्टी शेअर करत नसे. 2017-18 मध्ये एका प्रॉडक्शन हाऊससाठी काम न करण्याचा त्याने निर्णय घेतला आणि रियानेसुद्धा त्यांचं काम सोडलं, असं रियाने सांगितलं. सुशांतने यशराजबरोबर दोन चित्रपट केले होते आणि शेखर कपूर यांच्या ‘पानी’ चित्रपटातही तो होता. त्या चित्रपटाला यशराजकडून निधी मिळणार होता. पण हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. रियाने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतला मानसिक त्रास होता आणि तो त्यासाठी डॉक्टरांकडेही गेला होता. पण गेले काही दिवस तो डॉक्टरांनी दिलेली औषधं घेत नव्हता. तो आपले ताण-तणाव फार शेअर करत नसे. अशा वेळी तो एकटा राहणं पसंत करे. पुण्याजवळ पवना इथे त्याचं फार्म हाऊस होतं. तिथे जाऊन तो राहात असे. 6 जूनला सुशांत पुन्हा डिप्रेशनमध्ये होता. त्याने रियाला मला एकटं राहू दे, असं सांगितलं. घरातून निघून जाण्यास सांगितलं. त्यामुळे रियासुद्धा यावर काही न बोलता निघून गेली. थोड्या दिवसात सुशांत पुन्हा ठीक होईल. त्याला स्वतःसाठी वेळ हवा होता. एकांत हवा होता. तो देण्यासाठी आपण त्याच्या घरातून बाहेर पडतो, असं रियाने पोलिसांना सांगितलं. 6 जूनला सुशांतचं घर सोडल्यानंतर अचानक 14 जूनला त्याच्या आत्महत्येची बातमीच मिळाली आणि धक्का बसला, असंही रियाने सांगितलं.