अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. त्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान या एकंदरित प्रकरणातील महत्त्वाच्या घटनांचा क्रम काय होता हे आपण जाणून घेऊया
14 जून रोजी संपूर्ण बॉलिवूडला धक्का देणारी ही घटना घडली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरी मृतावस्थेत आढळून आला.
दरम्यान या घडामोडीनंतर अभिनेत्री कंगना रणौतने नेपोटिझम या विषयाला हात घालत बॉलिवूडमधील अनेकांवर गंभीर आरोप केले होते.
सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खान आणि निर्माती एकता कपूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
18 जूनला सकाळी 11 वाजता रिया चक्रवर्ती बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करता हजर झाली होती. वांद्रे पोलिसांनी रियाची तब्बल 10 तास चौकशी केली
20 जून रोजी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी 14 जणांचे जबाब नोंदवले. यामध्ये त्याचे कुटुंबीयांचा समावेश होता.
21 जून रोजी बिहार कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुजफ्फरपूर याठिकाणी राहणाऱ्या कुंदन कुमार यांनी मुख्य न्यायिक दंडाधिकारी यांच्या समक्ष याचिका दाखल केली होती.
20 जूनपर्यंत पोलिसांनी 23 जणांची चौकशी केली होती. त्यांनतर पोलीस सुशांतच्या ट्विटर अकाऊंटवरून आत्महत्येपूर्वी केलेल्या ट्विटचा शोध घेत होते पिंकविलाच्या अहवालानुसार पोलिसांना असा संशय आहे की, सुशांतच्या ट्विटर अकाऊंटवरुन काही ट्विट गायब होते. पोलिसांनी ट्विटरकडून काही गोपनीय माहिती मागवली होती.
27 जून रोजी सुशांतचे वायआरएफ बरोबर असणाऱ्या काँट्रॅक्ट संदर्भात यश राज फिल्म्सच्या माजी कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले.
30 जून रोजी सुशांतच्या शेवटच्याा सिनेमात त्याची सहकलाकार असणारी संजना सांघी हिची देखील चौकशी करण्यात आली. सूशांतवर करण्यात आलेल्या मीटू आरोपाबाबत काही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया तिने दिली होती.
जून अखेरपर्यंत संजना सांघी, सुशांतचे कुटुंबीय, कंटेट मॅनेजर सिद्धार्थ पिठानी, त्याचा केअर टेकर दीपेश सावंत, सुशांतची जवळची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्ती, YRF चे कास्टिंग डिरेक्टर इ. अशा एकूण 30 जणांचे जबाब आतापर्यंत नोंदवण्यात आले होते.
18 जुलै रोजी वायआरएफचे चेअरमन आदित्य चोप्राचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार आदित्य चोप्रा आणि संजय लीला भन्साळी यांच्या जबाबामध्ये विरोधाभास होता.
या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये चाहत्यांकडून सीबीआय चौकशीची मागणी वारंवार केली जात होती. त्याचप्रमाणे बिहारमधील काही महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी देखील सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
या तक्रारीत कुणा एका व्यक्तीविरोधात आरोप नाही. पण सुशांतच्या गर्लफ्रेंडवर वेगळा आरोप करण्यात आला आहे.
सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) आणि तिच्या कुटुंबावर आरोप केले आहेत. सुशांतला वेडं ठरवून त्याचे पैसे लुटायचा डाव रिया आणि तिच्या कुटुंबाचा होता असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे.
दरम्यान याप्रकरणी तपासासाठी पाटणा पोलिसांची 4 सदस्यीय टीम मुंबईत दाखल झाली आहे. याप्रकरणी पाटणा पोलिसांनी मंगळवारपासून चौकशी करण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. भादवी कलम 306 /341 / 342 /380 /406 /420 अंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे
रियाच्या आणखी चौकशीची गरज पडल्यास ट्रान्झीट रिमांडसाठी पाटणा पोलीस मागणी करू शकतात. त्यामुळेच रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करू शकते. -सूत्र
सूत्रांच्या माहितीनुसार सुशांतच्या वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटल्यानुसार तो त्याचा मित्र महेश शेट्टीबरोबर केरळमधील कुर्ग याठिकाणी शेती सुरू करणार होता. त्याची देखील पाटणा पोलिसांनी चौकशी केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनाची तयारी देखील केली आहे. रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिनाकरता मुंबई सत्र न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करू शकते. यासंदर्भात तिने वकील सतीश मानशिंदे (Satish Manshinde) यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे. सतीश मानशिंदे तेच वकील आहेत, ज्यांनी मुंबई बाँब हल्ल्याबाबत संजय दत्त तर त्यानंतर सलमान खान यांत्या केस लढल्या आहेत.