नागा शौर्या
मुंबई, 21 नोव्हेंबर : मनोरंजन सृष्टीत अनेकजण लग्नगाठ बांधत आहेत. अशातच आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने विवाह केल्याची बातमी समोर आली आहे. साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता नागा शौर्या ने लग्न केलं आहे. अभिनेता नागा शौर्याने 20 नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथील उद्योजक अनुषा शेट्टीसोबत लग्न केले. त्यांच्या भव्य लग्न सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. नागा आणि अनुषावर भरभरुन शुभेच्छा वर्षावही सुरु आहे. नागा शौर्या आणि अनुषा शेट्टीचा मेहंदी सोहळा 19 नोव्हेंबर रोजी झाला, त्यानंतर कॉकटेल पार्टी झाली. विवाह सोहळ्यासाठी वधू-वरांनी सुंदर पारंपारिक वेशभूषा केली होती. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सध्या याचीच चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे. स्टार जोडप्याने गार्डन सिटी बेंगळुरूमध्ये लग्नाचे विधी पूर्ण केले. यावेळी दाम्पत्याच्या खास नातेवाईकांनी हजेरी लावून या जोडप्याला शुभाशिर्वाद दिले.
नागा शौर्या आणि अनुषा शेट्टीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या जीवनाच्या नव्या टप्प्यासाठी सगळेजण त्यांना आशिर्वादही देत आहेत. त्यांचे चाहते तर खूप आनंदी आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ते शेअर करत आहेत. सध्या सर्वत्र या नव्या जोडप्याच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.
दरम्यान, लग्नाच्या चार दिवस आधीच अभिनेत्याची प्रकृती थोडी बिघडली होती. त्यामुळे सगळेजण चिंतेत होते की लग्न होणार की नाही. नागा शौर्याची एनएस 24 सिनेमाच्या सेटवर तब्येत अचानक बिघडली आणि तो सेटवरच बेशुद्ध पडला होता. त्याला तात्काळ त्याला हैद्राबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी तपासणी केली असता अभिनेत्याला खूप ताप असल्याचे आढळून आले. नागाच्या शरिरात अशक्तपणा आल्यामुळे तो बेशुद्ध पडला. मात्र तो लवकरच बरा झाला. आणि 20 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकला.