विनायक माळी
मुंबई, 07 जानेवारी : आज काल सोशल मीडियावर रिल्स किंवा व्हिडीओजद्वारे अभिनय करणारे इन्फ्लुएन्सरना छोट्या पडद्यावर मालिकांमध्ये एंट्री दिली जाते. सोशल मीडिया स्टारची आधीच प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असते. त्याचाच उपयोग मालिकांना होतो. मराठीत मालिकांमध्ये आतापर्यंत सोशल मीडिया स्टार असलेल्या बालकलाकारांची एंट्री होत होती. परी, चिंगी, आदिरा हि त्याचीच काही उदाहरणे आहेत. आता या यादीत अजून एका नावाचा समावेश होणार आहे. हा व्यक्ती म्हणजेच सर्वांचा लाडका दादूस म्हणजेच विनोदी कलाकार, सोशल मीडिया स्टार विनायक माळी आहे. विनायक माळीने आतापर्यंत आपल्या व्हिडीओज मधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्याचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. त्याची आगरी कोळी शैली प्रेक्षकांना विशेष आवडते. आगरी भाषेतील त्याचे भन्नाट व्हिडीओ अल्पावधीतच लोकांना आवडू लागले. युट्युबवरील त्याचे अनेक मजेशीर व्हिडिओ प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आता हाच दादूस छोट्या पडद्यावरच्या मालिकेत एंट्री घेणार आहे. हेही वाचा - Ashok Shinde: तब्बल 225 सिनेमे अन् 150 मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचा ‘या’ मानाच्या पुरस्काराने सन्मान माझी माणसं या मालिकेतून विनायक माळीचे छोट्या पडद्यावर आगमन करणार आहे. सन मराठी वाहिनीवरील माझी माणसं या मालिकेत हर्षदा आणि विघ्नेशच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. दोन दिवसांपूर्वीच या दोघांच्या हळदीचा समारंभ पार पडला त्यावेळी बिग बॉस फेम दादूसने त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी दादूसने हळदीचे गाणं म्हटले होते. हर्षदाचे लग्न होण्यासाठी गिरीजा अनेक संकटांना तोंड देत आहे. येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर ती यशस्वीपणे मात करत आहे.
हर्षदाच्या लग्नासाठी तिने पैशांची जुळवाजुळव केली. मात्र आता या लग्नात आणखी एक विघ्न आलेले पाहायला मिळणार आहे. विघ्नेशने आपल्या मुलीला फसवलं तो हर्षदासोबत लग्न करतोय हे पाहून नेहाचे वडील त्याला भर मंडवात त्याला हर्षदासोबत लग्न करण्यापासून थांबवतात आणि नेहाच्या पोटातील बाळ विघ्नेशचे आहे याचा खुलासा करतात. मात्र तेवढ्यात नेहाच्या पोटात असलेल्या बाळाची जबाबदारी घेणारा व्यक्ती तिथे येतो. या सर्व प्रकरणाचा उलगडा करतो. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून विनायक माळी हाच दाखवला आहे. आता हा विनायक माळी कायमचा मालिकेत राहणार कि फक्त एका एपिसोड पुरताच आला होता ते येणाऱ्या काळात समोर येईल.
विनायक माळी हा सोशल मीडिया स्टार आहे हे सर्वांना माहीत आहे. आगरी कुटुंबात जन्म झालेल्या विनायकने वकिलीचे शिक्षण घेतले. विप्रो कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तो सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ बनवू लागला. मात्र आता विनायक प्रथमच मराठी मालिकेचा भाग बनलेला पाहायला मिळणार आहे. माझी माणसं या मालिकेत तो अशीच एक जबरदस्त एन्ट्री करत धमाल उडवून देणार आहे. त्यामुळे त्याचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक तेवढेच उत्सुक आहेत.