सयाजी शिंदे
मुंबई, 14 मार्च- प्रतिनिधी- सचिन जाधव, - लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे नेहमीच वृक्षारोपणसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात. दरम्यान कोल्हापूर-सातारा रस्ता रुंदीकरणात झाडं तोडली जात आहेत. यातील काही झाडं वाचवुन महामार्गावरील झाडांच पुर्नरोपन सुरु असताना एक धक्कादायक घडली घटना. झाडांचं पुर्नरोपन सुरु असताना झाडावरील मधमाशा उठल्या आणि सयाजी शिंदेंसह इतर लोकांना देखील माशा चावल्या. मधमाश्यांच्या अचानक हल्ल्याने सर्वच गोंधळून गेले होते. सयाजी शिंदे यांना डोळ्याच्यावर आणि मानेला काही माश्या चावल्या आहेत. सयाजी शिंदे सुखरुप असुन पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे. मराठी-हिंदी आणि दाक्षिणात्य अशा सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलेले अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे होय. सयाजी शिंदेंचा मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्याने विविध सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. पडद्यावर खतरनाक खलनायक म्हणून प्रसिद्ध असणारे सयाजी खऱ्या आयुष्यात मात्र रिअल हिरो आहेत. सयाजी शिंदे आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या सामाजिक कार्यासाठीदेखील ओळखले जातात. सयाजी शिंदेनी झाडे लावण्याचा आणि वृक्षतोड रोखण्याचा विडा उचलला आहे. ते सतत झाडे लावा, झाडे जगवा अशा उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करत असतात. आजही याच कामासाठी ते सातारा-कोल्हापूर महामार्गावर पोहोचले होते.
अभिनेते सयाजी शिंदेनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितलं कि, मधमाश्यांनी आमच्यावर हल्ला केला. परंतु काळजीचं काही कारण नाही, मला दोन-तीन माश्या चावल्या आहेत. कानाभोवती थोडी सूज आली आहे. मात्र आम्ही आता सुखरूप आहोत. चिंतेचं कारण नाही.
अभिनेते पुढे म्हणाले, ‘पुणे-बेंगळूर महामार्गावर वृक्षतोड सुरु आहे. जवळजवळ २०० वर्षे जुनी ही झाडे आहेत. त्यांची तोड केली जात आहे. ही झाडे तोडून त्यांनतर दोन-चार झाडे लावली जातात. परंतु त्याचा योग्यरिरता पाठपुरावा केला जात नाही. त्यामुळे आताच पुढाकार घेऊन ही झाडे वाचवण्याचा आमचा उद्देश आहे’.