कोण होती संजय दत्तची पहिली पत्नी?
मुंबई, 31 मे- बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. यामध्ये मग संजयच्या आयुष्यात आलेली नाती असो किंवा त्याच्या पहिल्या बायकोसोबतचं लग्न असो.
संजय दत्त
साठी त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मासोबत लग्न करणंही सोपं नव्हतं. फारच कमी लोक आहेत ज्यांना अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीबद्दल माहिती असेल. वाचून आश्चर्य वाटेल की, संजयची पहिली पत्नी स्वतःही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. पण अगदी लहान वयातच ऋचाने या जगाचा निरोप घेतला होता.आणि कालांतराने ती पडद्याआड गेली. त्यामुळे अनेकांना तिच्याबाबत फारशी माहिती नाही. संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्माबद्दल सांगायचं झालं, तर तिचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. ती लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहात मोठी झाली होती. देव आनंद यांच्या चित्रपटात ती अभिनेत्री बनण्यासाठी भारतात आली होती. पण कमी वयामुळे तिला काम मिळू शकलं नाही. देव आनंद यांनी तिला वचन दिलं होतं की, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते तिला त्यांच्याच चित्रपटात काम देतील आणि नंतर त्यांनी त्यांच्या ‘हम नौजवान’ या चित्रपटात संधी दिली होती. विशेष याच चित्रपटातून अभिनेत्री तब्बूने 1985 मध्ये बॉलिवूड डेब्यू केला होता.ऋचा शर्माने आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं होतं. मात्र यशाच्या शिखरावर असताना ऋचाने आपलं करिअर उध्वस्त केलं. यामागे संजय दत्तवर असलेलं तिचं प्रेम हे कारण असल्याचं सांगितलं जातं. (हे वाचा:
Jennifer Winget: करणसोबत घटस्फोटावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलली जेनिफर; नेमकं काय म्हणाली बिपाशाची सवत?
) देव आनंद यांनी 1985 मध्ये ऋचा शर्माला त्यांच्या ‘हम नौजवान’ चित्रपटात अभिनेत्री म्हणून संधी दिली होती. या चित्रपटानंतर ऋचाने मागे वळून पाहिलं नाही. ऋचाने अनिल कपूरसोबतही चित्रपटात काम केलं आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीत तिने ‘अनुभव’, ‘इन्साफ की आवाज’, ‘सडक छाप’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अनेक उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. ऋचा शर्मा शेवटची 1987 मध्ये रिलीज झालेल्या ‘आग ही आग’ चित्रपटात दिसली होती. महत्वाचं म्हणजे या चित्रपटादरम्यानच तिची संजय दत्तशी भेट झाली होती.
संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय दत्तने ऋचाला पहिल्यांदा एका स्थानिक मासिकात पाहिलं होतं. अभिनेत्रीला पहिल्यांदा पाहताच संजय तिच्यावर भाळला होता. ‘आग ही आग’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजयने तिला प्रपोज केलं होतं. ऋचानेही त्याला होकार दिला. पण संजय दत्तची त्यावेळी असलेली प्रतिमा पाहता ऋचाच्या कुटुंबीयांना हे नातं मान्य नव्हतं. पण ऋचा संजयच्या प्रेमात पडली होती. आपल्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्व गोष्टी मी सोडणार असल्याचंही संजयने त्यावेळी म्हटलं होतं.असंही म्हटलं जातं की, संजयने ऋचाला लग्नानंतर चित्रपटात काम न करण्याची अट घातली होती. आणि त्यामुळेच तिने लग्नानंतर कधीही चित्रपटात काम केलं नाही.
रिपोर्ट्सनुसार, ऋचा आपल्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी होती. परंतु लग्नाच्या अवघ्या दीड वर्षानंतर समोर आलेल्या वाईट बातमीने संजय-ऋचाला हादरवून सोडलं होतं. लग्नाच्या दीड वर्षानंतर ऋचा शर्माला ब्रेन ट्युमर असल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे ऋचा उपचारासाठी अमेरिकेला गेली होती.याकाळात संजय आपल्या पत्नीची पूर्ण काळजी घेत होता. तिच्यासाठी सतत अमेरिका दौरे करत होता. पण कामाच्या व्यापामुळे तिचं अमेरिकेला जाणं कमी कमी होत गेलं. आणि याच काळात संजय आणि माधुरी दीक्षितचं नाव सोबत जोडलं जात होतं. दरम्यान संजयने ऋचासोबत घटस्फोट घेत सर्वानांच धक्का दिला होता. घटस्फोटानंतर ऋचा आतून खचत गेली. अशातच प्रकृती खालावल्याने 10 डिसेंबर 1996 रोजी ऋचा शर्माचं निधन झालं होतं. या दोघांची एक मुलगीसुद्धा आहे.