मुंबई, 13 जानेवारी : बॉलिवूड सेलिब्रेटीजची मुलांना लहानपणापासूनच प्रसिद्धी मिळते. मात्र ही प्रसिद्धी करीना कपूर ( karina kapoor) आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर याच्या वाट्याला काहीशी जास्तच आली. मीडियापासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडेच तैमूरची (Taimur ali khan) मोठी चर्चा झाली. प्रसिद्धीच्या या अतिरेकामुळे जोरदार टीकाही झाली. मात्र आता याच प्रसिद्धीमुळे अवघ्या 3 वर्षांच्या तैमूरला 1.5 कोटी रुपये मिळणार आहेत. तैमूरमुळे सैफ आणि करीनाला एका बेबी केअर ब्रँडने आपला चेहरा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच या कामासाठी त्यांना बक्कळ पैसेही मिळणार आहेत. याबाबतचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे. डायपरच्या एका लोकप्रिय ब्रँडने करीना आणि सैफला आपला ब्रँड अम्बॅसिडर बनवलं आहे. याबाबत कंपनीने करीना-सैफ या जोडीसोबत करारही केला आहे, असं वृत्त मिड-डे या वृत्तपत्राने दिलं आहे. या ब्रँडसाठी 3 तासांच्या उपस्थितीसाठी करीना आणि सैफला दीड कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ‘सैफ अली खान आणि करीना कपूर हे आपल्या ब्रँडसोबत जोडले जावेत यासाठी बेबी केअर ब्रँडचे प्रमुख खूपच उत्सुक होते. यासाठी ते गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होते. सैफ आणि करीनाची असलेली लोकप्रियता हे यामागील मुख्य कारण होतेच, पण त्यासोबतच तैमुरबाबत लोकांमध्ये असलेलं कुतूहल हादेखील मुद्दा कंपनीने विचारात घेतला असावा,’ असं मिड डेच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, सैफ आणि करीनाने सुरुवातीला तर बेबी केअर कंपनीचा प्रस्ताव फेटाळला होता. मात्र दुसऱ्यांदा झालेल्या चर्चेनंतर मात्र या जोडीने होकार दिला. त्यानंतर आता संबंधित बेबी केअरच्या एका शूटच्या बदल्यात सैफ-करीनाला दीड कोटी रुपये मिळतील, असंही या वृत्तात म्हटलं आहे. करीना कपूर आणि सैफ अली खान हे आपल्या इतर प्रोजेक्टमध्येही व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहेत. करीना लवकरच ‘अंग्रेजी मीडियम’ आणि ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमांत झळकणार आहे तर सैफ अली खान हा जवानी जानेमन’ या सिनेमात प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.