मुंबई, 27 ऑगस्ट : ‘सगळं काही मी केलं आहे, अशा प्रकारे माझी मीडिया ट्रायल सुरू आहे. मला या सगळ्यात खलनायिका केलं आहे. विच हंट सुरू आहे. पण मी सुशांतचं घर सोडलं त्यानंतर त्याची बहीण मीतू त्याच्याबरोबर राहायला आली होती. 8 ते 13 जूनदरम्यान काय झालं हे अजून बाहेर आलेलं नाही. हे प्रश्न का नाही विचारले जात?’ असं म्हणत रिया चक्रवर्तीने Network18 ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आणि सर्व आरोपांना उत्तरं दिली. News18 च्या मारिया शकील यांच्याशी बोलताना सुशांत सिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले. “माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जात आहे. मीच मानसिक त्रासातून जाते आहे. मलाच कधीकधी आयुष्य संपवावं वाटतं. पण मी हे असं अर्ध्यावर सोडून जाणार नाही. सत्य बाहेर यायलाच हवं”, असं रिया म्हणाली. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा (Sushant singh Rajput case) तपास नव्याने सुरू झाल्यानंतर रिया चक्रवर्तीवर (Rhea chakraborty interview) विविध आरोप होत आहेत. त्यातच रियाच्या whatsapp चॅटमध्ये ड्रग्जचा उल्लेख झाल्याने नार्कोटिक्स विभागानेही रिया चक्रवर्तीविरोधात तपास सुरू केला आहे. रियाने या सगळ्या आरोपांनंतर प्रथमच माध्यमासमोर आली आहे. ‘सुशांत मारियुआना घ्यायचा आणि त्याची ती सवय मोडावी म्हणून आपण प्रयत्न करत होतो’, असा दावा रियाने या मुलाखतीत केला. ‘आपला ड्रग डीलर्सची काही संबंध नव्हता. सुशांत त्याला हवं तेच करायचा. आपल्या सांगण्यावरून तो काही करत नव्हता. पाच वर्षांत तो वडिलांना भेटलेला नसल्याचं त्यानेच आपल्याला सांगितलं होतं’, असंही रिया या मुलाखतीत म्हणाली. अंकिता अजूनही सुशांतने घेतलेल्या घरात राहते ‘अंकिता लोखंडे आता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड असल्याचं दुःख सांगते आहे. पण सुशांतच अंकिताच्या घराचे हप्ते भरत होता. सुशांतच्याच मित्राबरोबर अंकिता आता रिलेशनशिपमध्ये आहे. यावर कुणी कधी बोलत नाही. अंकिताने स्वतःच्या अकाउंटचे दिलेले दाखले ताजे आहेत. त्याआधी कितीतरी मोठी रक्कम सुशांतच्याच खात्यातून जात होती. चार वर्षांत अंकिता सुशांतशी बोलली नव्हती, असं ती सांगते. मग रिया मला त्रास देते असं त्याने तिला कधी सांगितलं? अंकिताला हे प्रश्न कधीच विचारले जात नाहीत’, असं रियाने या मुलाखतीत सांगितलं. तिच्यावर होत असलेल्या सगळ्या आरोपांचं खंडन करत ती म्हणाली, ‘जो उठतो तो आरोप करतोय. आता मला आणि माझ्या कुटुंबाला लक्ष्य करतो आहे. माध्यमेच आता न्याय द्यायला बसली आहेत. विच हंट सुरू आहे’, असा आरोप तिने केला.