Dipika Chikhlia
मुंबई 15 ऑगस्ट: आज भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बॉलिवूड ते अगदी मराठी चित्रपटसृष्टी सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला सुद्धा फारच चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सामान्य जनतेपासून अगदी मोठमोठे स्टार यामध्ये सहभागी झाले आहेत. अनेक कलाकार आजच्या दिवशी तिरंग्यासह फोटो आणि स्पेशल मेसेज शेअर करत शुभेच्छा देत आहेत. एकीकडे हे असं चित्र असताना रामायण मालिकेतील दीपिका चिखलीया (dipika chikhlia independence day tweet) अभिनेत्रीकडून मोठी चूक झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दीपिका यांनी तिरंग्यासह फोटो शेअर केला आहे. कुर्ता पलाझो असा वेष करून हातात तिरंगा असलेला फोटो त्यांनी शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना मात्र दीपिका यांची गडबड झाली असून त्यांनी कॅप्शनमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांना टॅग केलं आहे. “75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.” असं लिहीत त्यांनी भारताचा झेंडा हातात असलेला फोटो शेअर केला आहे पण पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करण्याऐवजी त्यांनी चुकून पाकिस्तानच्या पंतप्रधान यांचं ट्विटर अकाउंट टॅग केलं आहे. त्यांच्या या चुकीमुळे सध्या त्या ट्रोल होताना दिसत आहेत.
दीपिका यांच्या या चुकीने सध्या नेटकरी त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत. अनेकांनी त्यांना धारेवर धरत त्यांना चूक लक्षात आणून दिली आहे तर काहींनी संधीचा फायदा घेत या घटनेवर मिम्स बनवायला सुरुवात केली आहे. काहींनी रामायणाचा संदर्भ जोडत ‘प्रभू तुम्ही कुठे आहात? आता अवतार घ्यावा लागेल’ असा खोचक रिप्लाय दीपिका यांना दिला आहे.
अनेकजण या चुकीची मजा घेत रामायणाचे संदर्भ जोडून मिम्स बनवत आहेत. अनेकजण त्यांच्या या कृत्याने बुचकळ्यात पडले आहेत. काही जण याची मजा घेत आहेत तर काहींनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
दीपिका या रामायण मालिकेचा महत्त्वपूर्ण भाग होत्या. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत त्यांनी सीतेची भूमिका साकारली होती. त्यामुळे प्रभू रामचंद्रांचा संदर्भ जोडत अनेकजण मिम्स बनवताना दिसत आहेत. दीपिका यांना आयुष्मान खुरानाच्या ‘बाला’ सिनेमात बघण्यात आलं होतं.