Raju Srivastav health update
मुंबई, 15 ऑगस्ट : प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (raju srivastav Health Update) सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीविषयी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सतत सांगितलं जात होतं. त्यामुळे त्यांचे चाहते आणि कुटुंबीय चिंतेत आहेत. अशातच त्यांच्या प्रकृतीबद्दल नवीन दिलासादायक माहिती समोर आली आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत पहिल्यापेक्षा जास्त सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, राजू श्रीवास्तव यांचं शरिर आता उपचाराला प्रतिसाद देत आहे. पहिल्यापेक्षा राजू श्रीवास्तव यांच्या शरीरातील अवयवही पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. रुग्णालयात दाखल केलं तेव्हा राजू श्रीवास्तव यांना 20% ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं, आता ते 10% ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. हेही वाचा - पदार्थांनंतर आता अभिनयाने मन जिंकणार ‘Madhura’s Recipe’ची मधुरा; ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूच्या एका भागात काही स्पॉट आढळले आहेत. ते काढण्यासाठी उपचार सुरू करण्यात आले आहेत. राजू श्रीवास्त यांच्या मेंदुत आढळलेले स्पॉट कोणत्याही दुखापतीमुळे झालेले नाहीत हेही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, त्यांच्या मेंदूच्या एका भागाला सुमारे 20 मिनिटे ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही, ज्यामुळे त्यांना शुद्धीवर येण्यास त्रास होत आहे. राजू श्रीवास्तव यांना शुद्धीवर येण्यासाठी किमान 7 दिवस किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. श्रीवास्तव यांचे चाहते सध्या त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. ट्विटरपासून अगदी सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे. राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी चाहत्यांना अफवांवर लक्ष देऊ नका असं आवाहनही केलं आहे.