पाकिस्तानात आहे राज कपूर यांचा आलिशान वाडा
मुंबई, 3 मे- बॉलिवूडमध्ये अशी काही कुटुंब आहेत, ज्यांच्या अनेक पिढ्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. या कुटुंबाचा इंडस्ट्रीत दबदबा आहे. यातीलच एक म्हणजे कपूर कुटुंब होय. कपूर कुटुंबाला बॉलिवूडमध्ये विशेष स्थान आहे. या कुटुंबातील लोकांच्या मुंबईच नव्हे तर देश-विदेशात अनेक ठिकाणी जमिनी आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, कपूर कुटुंबाची पाकिस्तानातही जमीन आहे. पाकिस्तानमध्ये राज कपूर यांच्या आजोबांनी बांधलेला एक आलिशान वाडा आहे. या वाड्याला ‘कपूर हवेली’ म्हणून ओळखलं जातं. हा वाडा पाडण्यासाठी काही दिवसांपूर्वी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. जी आता पाकिस्तानी न्यायालयाने फेटाळली आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेशावर उच्च न्यायालयात न्यायमूर्ती इश्ताक इब्राहिम आणि अब्दुल शकूर यांच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात हवेलीच्या मालकीची याचिका फेटाळून लावली आहे.
‘कपूर हवेली’ या नावाने प्रसिद्ध असलेली राज कपूर यांची ही संपत्ती 2016 मध्ये प्रांतीय सरकारने राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केली होती. (हे वाचा: Uorfi Javed Net Worth: उर्फी कमाईच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींना टाकते मागे, महिन्याला मिळतात इतके पैसे ) पीटीआयच्या वृत्तानुसार, खैबर पख्तुनख्वा प्रांताचे महाधिवक्ता यांनी न्यायालयाला माहिती दिली आहे की, प्रांतीय पुरातत्व विभागाने 2016 मध्ये एका अधिसूचनेद्वारे कपूर हवेलीला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले होते. याआधी पेशावरमध्ये उभा असलेला दिलीप कुमार यांचा आलिशान वाडा ताब्यात घेण्याची याचिकाही फेटाळण्यात आली होती. दिलीप कुमार यांचा किस्सा ख्वानी बाजा याठिकाणी आहे. कपूर घराण्यातील सर्व च सदस्यांचा पाकिस्तानमधील कपूर हवेलीशी संबंध असला तरी, राज कपूर यांचं मात्र वास्तूशी खास नातं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म याच आलिशान वाड्यात झाला होता. त्यामुळे राज कपूर यांना या वाड्याशी खास जवळीकता होती.
हा वाडा पृथ्वीराज कपूर यांचे वडील म्हणजेच राज कपूर यांचे आजोबा दिवाण बसेश्वरनाथ कपूर यांनी बांधला होता. ते एक पोलिस अधिकारी होते आणि त्याकाळात त्यांची पोस्टिंग पेशावरमध्ये झाली होती.मीडिया रिपोर्ट्सनुसार, वाड्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. परंतु तरीसुद्धा तरी ती ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.