रिचा चड्ढा
मुंबई, 26 नोव्हेंबर : तीन दिवसांपूर्वी रिचा चढ्ढाने एक वादग्रस्त ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटनंतर बराच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. रिचाने नॉर्दर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या वक्तव्यावर तिचं म्हणणं मांडताना एक ट्वीट केलं आणि गोंधळ सुरू झाला. रिचाने भारतीय जवानांचा अपमान केलाय, असं म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केलं. त्यानंतर रिचाने एक लांबलचक पोस्ट लिहून माफी मागितली होती. तिच्या माफीनंतर अक्षय कुमारने यावर प्रतिक्रिया देऊन रिचाच्या वक्तव्याचा निषेध केला होता. अक्षयच्या त्याच प्रतिक्रियेवरून अभिनेते प्रकाश राज यांनी अक्षयला सुनावलं आहे. या संदर्भातलं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे. काय म्हणाली होती रिचा? मंगळवारी (22 नोव्हेंबर) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये द्विवेदी यांनी, ‘‘पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्याबाबतचा प्रस्ताव संसदेत पाठवला आहे’’ असा उल्लेख करून पाकव्याप्त काश्मीरबद्दल विधान केलं होतं. याच विधानातल्या मजकुरासहीत द्विवेदी यांचा फोटो एका ट्विटर हॅण्डलवरून पोस्ट करण्यात आला होता. हा फोटो रिट्वीट करत रिचाने, ‘गलवान सेज हाय’ असं म्हणत ट्विट केलं होतं. त्यानंतर भारतीय लष्कराचा अपमान झाल्याचं अनेकांनी म्हटलं व नंतर रिचाने माफी मागितली. त्यावर अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली होती. हेही वाचा - Richa Chadha: ‘कलाकार म्हणजे शांती दूत…’ जेव्हा रिचाने केली होती पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण काय म्हणाला होता अक्षय कुमार? अक्षयने ट्विटरवर रिचाच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. “हे पाहून दुःख होतं. कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या सशस्त्र दलांबद्दल कधीही कृतघ्न होऊ नये. ते तिथे आहेत म्हणून आपण आहोत,” असं अक्षयने म्हटलं होतं. अक्षयच्या या ट्वीटवर अनेकांनी त्याबद्दल सहमती दर्शवली आणि रिचाला ट्रोल केलं होतं. त्या वेळी प्रकाश राज यांनी रिचाला पाठिंबा दिला होता आणि “रिचा तुला काय म्हणायचंय ते आम्ही समजू शकतो”, असं म्हटलं होतं.
प्रकाश राज अक्षयला काय म्हणाले? अक्षय कुमारने रिचा चढ्ढा यांच्यावर केलेल्या ट्वीटवर प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश राज यांनी अक्षयच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिलं, “अक्षय कुमार तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुझ्यापेक्षा रिचा चढ्ढा ही आमच्या देशाशी जास्त संबंधित आहे,” असं म्हणत त्यांनी अक्षय कुमारला फटकारलं, तर रिचाला पाठिंबा दिला आहे. रिचाने ज्यादिवशी गलवानबद्दल ट्विट केलं होतं, त्या दिवशीही त्यांनी आपण तिच्या बाजूने असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, हा सगळा वाद झाल्यानंतर रिचाने जाहीर माफी मागितली होती. “मी वापरलेल्या त्या 3 शब्दांमुळे कोणाचे मन दुखावले असेल, तर मी माफी मागते. कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. माझे आजोबा लष्करात होते, माझे काही भाऊ लष्करात आहेत. त्यामुळे माझ्या शब्दांमुळे दुखावले गेलेत, त्यांची मी माफी मागते. माझे आजोबा लेफ्टनंट कर्नल म्हणून 1960च्या भारत-चीन युद्धात सहभागी झाले होते. माझ्या आजोबांच्या पायात गोळी लागली. माझे मामाजी पॅराट्रूपर होते. ते माझ्या रक्तात आहे. आपल्याला वाचवताना लष्करातला एक जवान शहीद किंवा जखमी झाला, की त्याचं संपूर्ण कुटुंब प्रभावित होतं. मला वैयक्तिकरीत्या त्याची जाणीव आहे. माझ्यासाठीही हा एक भावनिक मुद्दा आहे,” असं रिचाने माफी मागताना म्हटलं होतं.