प्रदीप सरकार
मुंबई, 24 मार्च- मनोरंजन सृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन झालं आहे. नीतू चंद्रा श्रीवास्तव यांनी या दुःखद बातमीला दुजोरा दिला आहे. प्रदीप सरकार यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत त्यांनी ते आता या जगात नसल्याचं वृत्त दिलं आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूडवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर लोक त्यांना श्रद्धांजली देत आहेत. प्रदीप सरकार यांनी ‘परिणिता’, ‘हेलिकॉप्टर ईला’, ‘लागा चुनरी में दाग: जर्नी ऑफ अ वुमन’, ‘लफंगे परिंदे’, ‘मर्दानी’ असे अनेक गाजलेले चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीलाही धक्का बसला आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय.
नीतू चंद्रा श्रीवास्तव ट्विट- आमचे लाडके दिग्दर्शक @pradeepsrkar बद्दल जाणून खूप वाईट वाटलं.दादा त्यांच्यासोबत मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती. चित्रपट लार्जर दॅन लाइफ दाखवण्याची कला त्यांच्याजवळ होती.परिणितापासूनते लागा चुनरीमी दाग चित्रपटांपर्यंत. दादा, तुमची नेहमी आठवण येईल.#RestInPeace… असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रदीप सरकार हे प्रचंड अभ्यासू आणि सामाजिक भान असलेले दिग्दर्शक म्हणून ओळखले जायचे. यांनी गेल्या काही वर्षांत ‘नील समंदर’ (2019), ‘फॉरबिडन लव्ह’ (2020) आणि ‘कैसी पहेली जिंदगानी’ (2021) यांसारख्या प्रकल्पांवर काम केलं आहे. इतकंच नव्हे तर आगामे काळात आई-वडिल आणि मुलांमधील वयातील अंतरावर एक चित्रपट बनवणार होते. बॉलिवूडमधील टॉप दिग्दर्शकांमध्ये त्यांची गणना केली जाते. प्रदीप हे फक्त दिग्दर्शकच नव्हते तर ते एक उत्तम लेखकही होते. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी प्रदीप सरकार यांनी जाहिरात क्षेत्रात अनेक वर्षे काम केलं आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं. त्यांनंतर अभिनेते समीर खक्कर आणि आता दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे बॉलिवूडवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. सेलिब्रेटी आणि चाहते सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत.