मुंबई, 20 ऑगस्ट- टीव्हीवर काही दिवसांपूर्वी ‘बस बाई बस’ हा मराठी रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ महिला सेलिब्रेटी सहभागी झालेल्या पाहायला मिळतात. राजकारण ते मनोरंजनसृष्टी अशा प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिला याठिकाणी पाहुण्या कलाकार म्हणून सहभागी होतात. दरम्यान आता या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री पूजा सावंत दिसून येत आहे. अर्थातच आगामी एपिसोडमध्ये अभिनेत्री पूजा सावंत पाहुणी म्हणून दिसून येणार आहे. नुकतंच पूजा सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘बस बाई बस’चा एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये पूजा सुबोध भावे आणि सेटवरील इतर महिला कलाकरांसोबत धम्माल करताना दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये पूजा नेहमीसारखीच अतिशय सुंदर दिसत आहे. जांभळ्या रंगाच्या पारंपरिक साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. या प्रोमोमध्ये पूजा मनसोक्त गप्पा मारताना दिसून येत आहे. यावेळी अभिनेत्रीनं आपलं एक गुपितदेखील उघड केलं आहे. त्यामुळे सध्या पूजाची चांगलीच चर्चा सुरु आहे. अभिनेता सुबोध भावे ‘बस बाई बस’चं सूत्रसंचालन करत आहे. या शोमध्ये सुबोध सेलेब्रेटींसोबत त्यांच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यासंबंधी गप्पा मारत असतो. दरम्यान त्यांच्यासोबत विविध मजेशीर खेळही खेळत असतो. या शोमध्ये आलेली पाहुण्या कलाकरांना एक टास्क दिला जातो. यामध्ये त्यांच्या आवडत्या किंवा प्रति स्पर्धकांचे फोटो देऊन त्यांच्याशी गप्पा मारण्याचं चॅलेंज दिलं जातं. याच नियमानुसार पूजाला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा फोटो दाखवून त्याच्याशी संवाद साधण्याचा टास्क देण्यात आला होता.
**(हे वाचा:** Priya Bapat: मुंबईच्या पावसाची प्रिया बापटलाही भुरळ, हातात कलरफुल छत्री घेऊन म्हणतेय…. ) यावेळी बोलताना पूजा सावंतनं सांगितलं बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रावर आपला प्रचंड मोठा क्रश आहे. त्याच्याशी लग्न झालं तर मला प्रचंड आवडेल’. अभिनेत्रीनं असं म्हणताच सेटवर एकच कल्ला पाहायला मिळतो. पूजा सावंत मराठीतील प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा एक खास चाहतावर्ग आहे. ती सतत सोशल मीडियावर आपल्या दैनंदिन अपडेट्स शेअर करत असते. मराठीसोबतच पूजाने हिंदी चित्रपटामध्येही काम केलं आहे. दरम्यान पूजा सावंत स्पेशल ‘बस बाई बस’चा हा एपिसोड आज रात्री प्रसारित केला जाणार आहे.