मुंबई, 30 जून : फिल्ममेकर महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या ‘सडक 2’चे पहिले पोस्टर आज लॉन्च करण्यात आले. ज्यामध्ये महेश भट्ट यांच्या मुली अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि पूजा भट्ट (Pooja Bhatt) मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत. मात्र महेश भट्ट यांनी हे पोस्टर शेअर करताच त्यांना सोशल मीडियावर रोषाचा सामना करावा लागला. सोशल मीडिया युजर्सनी मोठ्या प्रमाणात आलिया आणि महेश भट्ट यांना ट्रोल केले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (Sushant Singh Rajput Suicide) निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. त्यांनी नेहमी नेपोटिझमला चालना दिली आणि जे या इंडस्ट्रीमध्ये बाहेरून आले आहेत त्यांना पुढे येऊ दिले नाही अशा आरोपांना गेल्या काही काळात महेश भट्ट यांना सामोरे जावे लागले आहे.
सोमवारी महेश भट्ट यांनी ‘सडक 2’ चे पोस्टर लाँच करताच कमेंट सेक्शनमध्ये सोशल मीडिया युजर्सता राग आणि संताप दिसून आला. अनेकांनी कमेंट करत ‘नेपोटिझम’ या विषयावरून जोरदार टिका केली आहे. ‘जेव्हा तुम्ही शेवटापर्यंत पोहोचता, त्यावेळी तुम्हाला समजते की शेवट नाहीच आहे’, असे कॅप्शन देत भट्ट यांनी हे पोस्टर लाँच केले आहे. दरम्यान सुशांतच्या चाहत्यांनी हे पोस्टर पाहताच चित्रपट बॅन करण्याची मागणी केली आहे. यामध्ये आलियाबरोबर आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत आहे. आलिया आणि आदित्यने देखील सोशल मीडियावर सडक संदर्भात पोस्ट शेअर केली, मात्र त्यांना देखील ट्रोलिंगची शिकार व्हावे लागले आहे.
सडक 2 हा सिनेमा 1991 मध्ये आलेल्या सडक या सिनेमाचा सिक्वेल आहे. त्यामध्ये संजय दत्त आणि पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होते. दरम्यान या सिक्वेलमध्ये दोन्ही जोड्या एकत्र दिसणार आहेत.