मुंबई, 2 मार्च- मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्या सध्या मराठी मालिकांमध्ये काम करताना दिसत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेमध्ये निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय निवेदिता सराफ सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असतात. त्यांचे काही जुने फोटो तसेच अशोक सराफ यांच्यासोबतच्या काही रोमॅंटिक आठवणी शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमातील एक सुंदर आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे. निवेदिता सराफ यांनी नुकताच एक त्यांचा सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं असाचं आहे. त्यांनी देखील हा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमातील एक सुंदर फोटो… चाहत्यांनी देखील त्यांच्या या फोटोवर कमेंट करत त्यांच्या सुंदरतेचे कौतुक केलं आहे. ‘आज तिला जाऊन चौदा वर्ष झाली…’ आईच्या आठवणीत भावुक झाला अनिरुद्ध नवरी मिळे नवऱ्याला सिनेमाच्या सेटवर दोघाचं प्रेम झालं मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ. या जोडीला ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयात 18 वर्षांचे अंतर आहे. नवरी मिळे नवऱ्याला सिनेमात दोघांनी एकत्र काम केले.
या चित्रपटात काम करताना त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे लग्न निवेदिता यांच्या घरतल्यांना मान्य नव्हते. आपल्या मुलीने सिनेइंडस्ट्रीतील व्यक्तीशी लग्न करू नये अशी आईची इच्छा होती. त्यामुळे सुरूवातीला घरातून तीव्र विरोध झाला. मात्र निवेदिता आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यामुळे त्यांच्या हट्टापुढे घरातल्यांना नमते घ्यावे लागले.अशोक आणि निवेदिता यांचा विवाह गोव्यातील मंगेशीच्या देवळात पार पडला.
नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ ,श्रीकांत मोघे, दया डोंगरे, जयराम कुलकर्णी, संजय जोग, नीलिमा परांडेकर, आशालता वाबगांवकर अशी स्टारकास्ट होती. या सिनेमातील गाणी आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत.