मुंबई, 26 फेब्रुवारी- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि कलाकार त्यांना विनम्र अभिवादन करत आहेत. नुकतंच अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. अभिनेते शरद पोंक्षे त्यांच्या रोखठोक वक्तव्यमुळे कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते फार सक्रिय असतात. नेहमी त्यांच्या व्याख्याना दरम्यानचे व्हिडीओ शरद पोंक्षे इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करतात. शरद पोंक्षे यांना सावरकरवादी म्हणून ओळखले जाते. ते कायम त्यांचे विचार सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतात. नुकतंच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. वाचा- रंग माझा वेगळामधील नवी कार्तिकी रिअल लाईफमध्ये आहे खूपच बोल्ड शरद पोंक्षे यांनी काय म्हटलं आहे पोस्टमध्ये? शरद पोंक्षे यांनी एका जुन्या वृत्तपत्राचा फोटो शेअर केला आहे. या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर यांचे स्वर्गारोहण!’ अशा मथळ्याखाली असलेली बातमी पाहायला मिळत आहे. याबरोबरच शरद पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एक चित्रही शेअर केले आहे. “आज विश्वरत्न स्वा सावरकरांची पुण्यतिथी. स्वतंत्र भारतात जिवंत समाधी घेणारे शेवटचे युगपुरुष .विनम्र अभिवादन”, असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे. शरद पोंक्षे यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केले आहे. तर काहींनी टीका देखील केली आहे. त्यामुळेच सध्या शरद पोंक्षे यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत. शरद पोंक्षे सध्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत काम करताना दिसतात. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत असते.
शरद पोंक्षे हे मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रातील एक प्रतिभावंत कलाकार म्हणून शरद पोंक्षे ओळखले जातात. नाट्यसृष्टी बरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच अतिशय संवेदनात्मक अशा सर्व तऱ्हेच्या भूमिका यशस्वीरित्या साकारणारे अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जाते.
शरद पोंक्षे यांचे इयत्ता सहावीपर्यंतचे शालेय शिक्षण मिरज येथे आजोळी झाले . त्यानंतर त्यांयाचे कुटुंब मुंबईत हलल्यावर, भायंदर येथील अभिनव विद्या मंदिर येथील शाळेत त्यांचे पुढील शालेय शिक्षण झाले . इयत्ता बारावीनंतर त्यांनी तीन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम केला. डिप्लोमा अभ्यासक्रमानंतर ते बेस्टमध्ये नोकरीत रुजू झाले. इ.स. १९८८ साली दे टाळी या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेद्वारे त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले . इ.स. १९८९ साली वरून सगळे सारखे या नाटकातील भूमिकेद्वारे त्यांचा व्यावसायिक रंगमंचावर प्रवेश झाला. शरद पोंक्षे यांच्या नाट्य कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचा पहिला प्रयोग १० जुलै १९९८ रोजी झाला . या नाटकातील व अन्य माध्यमांतील यशामुळे त्यांनी अभिनयावर लक्ष एकवटण्याचा निर्णय घेतला.